मुंबईत नोकरी मिळाली या कल्पनेनेच मी एकदम हरखून गेलो होतो.
तसे हे शहर मला नवीन नसले तरी “प्रवासी” म्हणून मुंबईत येणे आणि आता “रहिवासी” बनून येणे यात फरक होता. थोडं दडपण होतं. सुदैवाने माझ्या दूरदर्शन मध्ये काम करणा-या एका मित्राच्या ओळखीने ठाण्यात पेईंग गेस्ट म्हणून जागा मिळाली. ऑफीस अंधेरीत आणि फॅक्टरी भिवंडीच्या पुढे वाडा नावाच्या गावात होती. दोन्हीकडे आलटून पालटून जावं लागणार असल्याने ठाण्यात रहाणे सोयीचे होईल हे त्या मित्राने समजावून सांगितले होते.
घर ते फॅक्टरी प्रवासाला “इतका” वेळ लागतो हा पहिला धक्का होता!! कंपनीची बस होती तरी साधारणपणे जाताना दीड तास आणि येताना दोन तास लागत. सकाळी ६.५० ला बस ठाणे स्टेशन वरून निघायची आणि साडे आठ पर्यंत फॅक्टरीत पोहोचायची. त्या दरम्यान बरीच मंडळी आपली रात्रीची शिल्लक राहिलेली झोप पूर्ण करत. या वेळेत माझे एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचून होत असे.
साडे आठ पर्यंत फॅक्टरीत पोचलो की प्रवेशद्वाराच्या जवळच मोठ्ठे कॅन्टीन होते. तिथे नाश्ता करून मग नऊ वाजता शिफ्ट सुरू होई. दुपारी साडेबारा ते दीड या जेवायच्या वेळी आणि नंतर दुपारी चार नंतर पाच वाजता शिफ्ट संपेपर्यंत चहा-नाश्त्यासाठी कॅन्टीन उघडलेले असायचे. फॅक्टरीत कामगार आणि अधिकारी अशी दृश्यं स्वरुपात विभागणी होती. कामगारांची युनियन होती. त्या युनियनचे अध्यक्ष कधी कधी फॅक्टरीत येत. मागे-पुढे एकेक उघडी जीप आणि मध्ये काळ्या काचा असलेली पांढरी गाडी..असा ताफा गेटवरुन आत आला की वातावरण एकदम ‘टाइट’ होत असे. बरं, हे अध्यक्ष महोदय कंपनीत शॉप फ्लोअर वर फिरतानाही त्यांच्या मागे दोन बंदुकधारी बॉडीगार्ड असत. (आजकाल हे महोदय महाराष्ट्राचे माननीय आमदार आहेत!!). त्यामुळे हे अध्यक्ष फॅक्टरीत आले की कामगारांच्या उत्साहाला उधाण येई तर फॅक्टरी मॅनेजर आणि त्यांच्यासोबत व्यवस्थापन (General administration) करणारी मंडळी सतर्क होत असत.
अशाच एका दिवशी, युनियन अध्यक्ष आले असताना मला मिटिंगमध्ये बोलावणे आले.
‘मी काय केलंय?’, ‘माझा कुठल्या कामगारांशी वाद झालाय का? मी कुणाला काही बोललोय का?’ हे सगळं आठवत आणि ‘मला कशाला बोलावलंय?’ असा प्रश्न चेहेर्यावर ठेवतच मी मिटींगरूममध्ये प्रवेश केला. समोर फॅक्टरी मॅनेजर, काही वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत युनियनचे अध्यक्ष, फॅक्टरीतले युनियन लिडर्स सगळे बसले होते. माझ्या सोबतीला माझ्यासारखे एक-दोन ऑफिसर्स होते. वातावरण गंभीर होते.
कदाचित माझ्या कपाळावरच्या आठ्या फॅक्टरी मॅनेजरच्या नजरेस पडल्या असाव्यात. त्यांनी मला विचारलं, “मंदार, बॅचलर हो ना?” मी अजून घाबरलो! (मनात) म्हटलं, “आता हे काय नवीन ‘लफडं’??” सावंत नावाचा एक युनियन लिडर माझ्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. त्याला माझी अवस्था (की व्यथा) कळाली. तो हसत हसत साहेबांना म्हणाला, “सर, क्यूँ परेशान कर रहे हो उसको? ये टिफीन नहीं लाता है, इधरही कॅन्टीन में खाता है..!!”
मग साहेब म्हणाले, “ठीक है.. मंदार, कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर, रोज का मेन्यू और उसकी क्वालिटी मॉनिटर करने के लिए हमने एक कमिटी बनायी है.. परचेस की तरफ से इसमें तुम मेंबर रहोगे. जल्दही शर्मासाहब आप सभी कमिटीकी मिटींग बुलाएंगे”.
हुश्श!! इतकंच होतं!! “ओके, थॅन्क्स” म्हणून बाहेर पडलो.
दोन-तीन दिवसांनी कमिटीची मिटींग झाली. चार कामगार प्रतिनिधी, दोन अधिकारी, शर्मा साहेब, त्यांच्या हाताखालचा एक अधिकारी असे आम्ही आठ जण होतो. फॅक्टरी मॅनेजर कमिटीचे अध्यक्ष होते, पण ते कधीच मिटींगला आले नाहीत.
सर्वसाधारण मेन्यू ठरलेलाच होता…वडा-पाव, सामोसा, इडली-सांबार, मेदू वडा, पोहे वगैरे नाश्त्यासाठी आणि रोटी, भाजी, भात, रोज एक स्वीट पदार्थ असा जेवणासाठी अशा मेन्यू मधून कुठल्या दिवशी काय इतकेच ठरवायचे आहे, असा माझा कयास होता. आणि फॅक्टरी पुण्यात नसल्यामुळे ‘संकष्टीच्या दिवशी खिचडी आणि ताक हवेच!’ असंही कुणी म्हणण्याची अपेक्षा नव्हती!! त्यामुळे मिटींग सहज पार पडेल असे वाटले होते.
मेन्यू ठरला होताच. मला शर्मा साहेबांनी त्यावरून नजर फिरवायला सांगितली. माझ्यातला पर्चेस मॅनेजर जागा झाला…मी म्हणालो, “इडली, समोसा वगैरे ज्या दिवशी आहे, त्यादिवशी ‘पाव’ कशाला??” इतकं पुरेसं होतं. मिटींगचा नूरच पालटला.. युनियन लिडर एकदम चवताळले… “अरे, हमारा मजदूर मेहनत करता है, आप उसके खानेपे उतर गए आज? उसको पेटभर खानेका भी अधिकार नही दोगे??”… मला काहीच कळत नव्हते की नेमके कुठे चुकले आहे!! शर्मा साहेबांनी स्वतःचा अधिकार वापरून मिटींगचा मूड ठीक केला. रोज “पाव” अनिवार्य ठरवला गेला… अगदी दुपारच्या जेवणातही जर कुणाला रोटी नको असेल तर त्याला ‘पाव’ द्यायचे ठरले!!
पण मला कळत नव्हते की हा ‘पावाचा” आग्रह कशासाठी??
मिटींग संपली….दुपारी मी आणि माझा एक सहकारी चहा प्यायला गेलो. मी त्याला वरचा किस्सा सांगितला..तो जोरजोरात हसायला लागला. मला म्हणाला..तुम मुंबईमें नये लगते हो..’पाव’ मुंबई का मेन-फूड है..जैसे साऊथमें राईस वैसे मुंबई में ‘पाव’!!..देख लेना लोग कैसे और किसके साथ खाते है पाव!!
आणि खरंच, पुढचा एक आठवडा मी पहात होतो.. मुंबईकर पाव कसे खातात??... वडा-पाव हा अगदीच मामुली प्रकार होता!!
खरंतर जरी बटाटे-वडा तोच असला तरी सोबत शेंगा चटणी आली की तो सोलापूरचा असतो, (कट) सांबाराच्या बाउलमध्ये बुडून आला की कोल्हापुरचा असतो, खोबर्याच्या चटणीसोबत आला तर कर्नाटकी असतो, नागपुरात त्याचा “बोंडा” होतो आणि कापलेल्या पावात कोंबला की मुंबईचा असतो!!
असो.. तर पुढच्या एका आठवड्यात मला कळले की पावासोबत काय काय खाता येईल!!! कापलेल्या पावात वडा कोंबून “वडा-पाव” इथवर ठीक होतं..पण पावात कधी सामोसा कोंबला गेला तर कधी चक्क कांदाभजी!!! यावरून मला खात्री होती की आता ‘इडली’ पण नक्की घुसमटणार पावामध्ये!! पण नशिबाने ज्या दिवशी मेन्यू मध्ये इडली होती त्यादिवशी पाव सांबारात बुडवून खाल्ले गेले आणि इडलीला चटणीची सोबत मिळाली!!
हळूहळू पाव हे सर्वमान्य आणि सर्वत्र कधीही मिळेल असे मुंबईचे अन्न आहे यावर माझा विश्वास वाढू लागला होता. जर ‘लोकल ट्रेन’ ही मुंबई ची लाईफ लाईन असेल तर ‘पाव’ हा मुंबई चा ‘ऑक्सिजन’ आहे, याची खात्री पटली.
या मुंबईतील वास्तव्यात अगदी इडली किंवा पोह्यासोबत नसले तरी कधीतरी रोटी ऐवजी पाव खायला मी सरावलो होतो.
मला आता ‘पाव’ खरंच पावला होता…मी मुंबईकर होण्याची ती सुरूवात होती.
*********
No comments:
Post a Comment