Sunday, 9 February 2025

WhatsApp हॅक झाल्याची कथा...

वपुंचे एक वाक्य आहे “ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना प्रचंड घाबरलेला पेशंट बरा होऊन बाहेर आल्यानंतर आपल्या दुखण्याचं किंवा जखमांचं वर्णन एखाद्या विजेत्या योद्ध्यासारखे करतो”!!

हे आठवण्याचे कारण दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या बायकोचे WhatsApp काही अज्ञात हॅकर्सनी हॅक केले. ते पूर्ववत सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या दरम्यानच्या काळात मला, तिला किंवा इतर जवळच्या व्यक्तींना आलेले विविध “फोनानुभव” नोंद करून ठेवण्याचा हा प्रयत्न!!

आजकाल WhatsApp हे सहज साध्य आणि सहज वापरता येईल असे App असल्यामुळे त्याचा वापर कोण आणि किती करते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे हॅक झालेल्या WhatsApp मध्ये असलेल्या तिच्या सगळ्या कॉन्टॅक्ट नंबर्सना याची झळ बसली. निरनिराळ्या वयोगटातील नातेवाईक, शाळा/कॉलेजचे मित्र, रहिवासी सोसायटीचे सदस्य, सामाजिक संस्थांचे सदस्य, मुलांच्या शाळेतील पालक, मुलांचे मित्र-मैत्रिणी, दुकानदार, डॉक्टर, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन वगैरे वगैरे सगळे कॉन्टॅक्ट जे एखाद्याच्या फोनमध्ये सहज असतात ते सगळे यात भरडले गेले.

जवळपास या सगळ्यांना हॅकर्सनी पैसे मागण्याचा मेसेज केला, काहींना डिजीटल पेमेंटसाठी (स्वतःचा) टेलिफोन नंबर दिला (ज्यावर फोन कॉल जात नाही), काहींना पैशासाठी QR code दिला.

या सगळ्या प्रकरणावर यातल्या काही निवडक मंडळींच्या प्रतिक्रिया मोठ्या बोलक्या आहेत:

आमच्यापेक्षा जेष्ठ मंडळी (earlier Gen-X) - ही साठी-सत्तरीची (बहुतेक निवृत्त) मंडळी - WhatsApp वापरतात. रोज अगदी पहाटेपासून ऑनलाईन असतात. देवाचे फोटो, गुड मॉर्निंग सुविचार, आरोग्याच्या टीप्स, काही राजकीय मुद्दे यांची “ढकला-ढकली” यातल्या बहुतेक मंडळींकडून दिवसभर सुरू असते. ही मंडळी डिजीटल साक्षर आहेत, WhatsApp मेसेजेस पुढे ढकलतात, रोजच्या रोज स्टेटस बदलतात, पण डिजीटल सुरक्षा आणि जरा वळणाच्या बाहेरचा रस्ता आला की गडबड होते. यात अजून भर म्हणजे कधीकधी इंग्रजीचीही थोडीशी अडचण असते.

कालच्या भानगडीत अशाच एका काकूंनी कुठलाही शहानिशा न करता, आपल्या मैत्रिणीचा मेसेज आलाय म्हणून दहा हजार रुपये पाठवून दिले नशीबाने ते बायकोच्या खात्यातच आले! नंतर त्यांना फोन करून विचारले तर म्हणाल्या, “ असशील अडचणीत, म्हणून पाठवले. पण मला त्या दुसऱ्या नंबरवर कसे पाठवायचे ते माहिती नव्हते, म्हणून तुझ्याच कॉन्टॅक्टवर पाठवले!”

दुसऱ्या एका काकूंनी फोन केला आणि विचारलं, “काय झालंय गं?”

काकू फोन हॅक झालाय, हॅकर पैसे मागतोय, मी नाही.

तर म्हणाल्या, “बरं! मग किती पाठवू?”

एका जेष्ठ वहिनींनी विचारलं, “नवर्याशी भांडलीस का? मी बोलते त्याच्याशी. तो देईल पैसे.” त्यांनी इथेच न थांबता असाच निरोप माझ्या बहिणीलाही दिला.

या गटातील काहीजणांना हा पैसे मागणारा मेसेज म्हणजे काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले त्यांनी पटकन तो मेसेज डिलीट करून टाकला आणि आपण सेफ असल्याची खात्री करून घेतली!!

त्यामानाने आमचे समवयस्क (Gen-X) ही थोडीशी सजग मंडळी. यांना लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. खरं कारण म्हणजे आजवर मराठीत लिहीणारी आज अचानक इतकी इंग्रजी का झाडते आहे ही शंका होती!! त्यांनी लगेच मला, बायकोला किंवा माझ्या मुलांना फोन करून हॅक झाल्याची माहिती दिली. हॅकर्सशी सुरक्षित संवाद साधत त्यांच्याकडून फोन नंबर्स, QR codes वगैरे मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मिळालेली माहिती आमच्यापर्यंत पोचवली.

या गटातील बहुतेक मंडळींनी आमच्यापैकी कुणाला तरी फोन केला आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली.

यातल्या एक-दोघांनी हॅकर्सना पोलिस केस करण्याची धमकी दिली आणि ते ब्लॉक झाले!

असे असले तरीही काहींनी उगाच नसतं लफडं नको म्हणून बायकोचा कॉन्टॅक्ट स्वतःच्या फोनमधून डिलीट केला. काहींनी तिला ब्लॉक केले.. काहींनी तिला गृप मधून हाकलून दिले तर काहींनी तिला वगळून इतर सगळ्यांचा एक वेगळा नवीन गृप बनवला आणि आता तिला या नवीन गृप मध्ये येऊ द्यायचे नाही- असा ठराव मंजूर करून घेतला. जुन्या गृपवर “फक्त ॲडमिनच पोस्ट करेल” अशी आणिबाणीही जाहीर केली गेली.

एवढे असूनही यातल्या बहुतेकांनी आम्हाला झाल्या प्रकाराबद्दल पोलीसांच्या सायबर शाखेत गुन्हा नोंदविण्याचा सल्ला दिला.

पण या वयोगटातही काही धमाल कॉल आले.

एका मैत्रिणीने या प्रकारानंतर ताबडतोब तिच्या नवऱ्याच्या मागे लागून नवीन सीम आणि नवीन हॅंडसेट घेतला आहे. आता ती एका नंबरवर फक्त WhatsApp आणि दुसरा नंबर फोन करणे, सोबतच आधार कार्ड, बॅन्क अकाउंट यांना जोडण्यासाठी वापरणार आहे, असे तिने आवर्जून आम्हाला फोन करून आणि whatsapp गृपवर लिहून सगळ्यांना सांगितले आहे.

एक सद्गृहस्थ म्हणाले, “मी मदत करणार होतो  पण एवढे पैसे माझ्या खात्यात नाहीत, आठ दिवसांनी दिले तर चालतील का?”.

एक मित्र फोन करून म्हणाला, “तुझा whatsapp मेसेज मिळाला. पैसे द्यायची इच्छा आहे पण माझ्या मुलीचे लग्न ठरले आहे. मुलाकडच्या मंडळींनी अमुक तोळे सोने, कपडेलत्ते मागितले आहेत. कार्यालयाचे भाडे इतके आहे. एकुलती एक मुलगी असल्याने लग्नाला पाच-सहाशे लोकांना बोलवायचे आहे. हा सगळा खर्च करण्यासाठी मलाच पैशाची गरज आहे. आता तू सगळ्यांना मागतेच आहेस. जर तुझ्या गरजेपेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर ती मला दे मी तीन-चार महिन्यात परत करतो”.

एकाला on-line पैसे transfer करताना नेटवर्कची अडचण आली म्हणून त्याने आपल्या मुलाला तातडीने पैसे पाठवून द्यायचा तगादा लावला. गरजवंताला मदत करण्याविषयी व्याख्यान दिले. मुलाने वडीलांना सत्य परिस्थिती सांगितली. तेंव्हा मामला शांत झाला.

त्यामानाने आमची पुढची पिढी (Gen-Y and Gen-Z) एकदम “कुल” होती. ज्यांना मेसेजेस आले त्यांनी त्या मेसेजेसना उत्तर देण्याची तसदी घेतली नाही. उलट मला, माझ्या मुलांना फोन हॅक झाला असल्याची माहिती दिली. काहींनी whatsapp सोबत इमेल, बॅन्क अकाउंट तपासण्याची सुचनाही केली.

WhatsApp हॅक झाल्यावर कुठे तक्रार करायची याची माहिती दिली.

अर्थात यातल्या कुणीही पैसे भरण्याची घाई केली नाही  याउलट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती प्रसारित करण्यासाठी आणि लोकांना सतर्क करण्यासाठी पुढाकार घेतला.

काहीजणांनी “काय काकू/मावशी, मला का पैसे मागताय?” किंवा “किती पैसे गोळा झाले? आता काय करायचे इतक्या पैशांचे?” अशी मस्करीही केली.

पण झालेला प्रकार भयानक होता. अचानक इतक्या लोकांना पैसे मागण्याचा whatsapp मेसेज जातो आणि पुढच्या चार-पाच तासात येणारे फोन कॉल्स थांबतच नाहीत.

या प्रकारातून काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या

१.      त्या दोन दिवसांत कितीजणांनी फोन केले...आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे, पण कधीच आपल्याला फोन न करणारे, शाळेत एका बाकावर बसणारे, पण नंतर फक्त एका whatsapp गृप मध्ये आहोत इतकाच संबंध असणारे, वीस-पंचवीस वर्षांपूर्वी शेजारी रहात असलेले, दूरदूरचे नातेवाईक, बरीच वर्षे संपर्कात नसलेले मित्र-मैत्रिणी..असे कितीतरी!! नवीन वर्षाच्या किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यापुरता संबंध असलेले कितीतरी कॉन्टॅक्ट यावेळी बोलते झाले.

२.      आपल्यावर प्रेम करणारे, आपली काळजी असणारे इतके लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत हा एक सुखद अनुभव होता.

३.      आपल्या एका (हॅकरने पाठवलेल्या) मेसेजवर कुठलीही शहानिशा न करता, “असेल खरोखर अडचण” असे समजून पैसे पाठवणारी मंडळी तर ग्रेटच!! समाजात अजूनही भोळी-भाबडी आणि संत वृत्तीची माणसं आहेत याचा प्रत्यक्ष अनुभवच!!

४.      एखाद्या अवघड प्रसंगी कोण कसा वागेल हे समजून घेण्याची ही एक संधी मिळाली.

५.      हरियाणा पुलिस हे अतिशय सौजन्यशील डिपार्टमेंट आहे. त्यांची सायबर शाखा आपल्याला on-line मदत करू शकते.

६.      डिजीटल app हाताळणारे युजर्स हे डिजीटल सुरक्षा या विषयी बरचसे अज्ञानी आहेत. पुढच्या दहा वर्षांत डिजीटल सुरक्षा देणार्या आणि त्यात काम करणाऱ्या NGO ना भरपूर प्रमाणात मागणी असणार असे एकंदरीत चित्र आहे.

या व्यतिरिक्त, काही बाबतीत आपण सगळ्यांनी माहिती घेतली पाहिजे:

१.      WhatsApp मधून आपण log-out होऊ शकत नाही. तसा पर्यायच त्या app मध्ये उपलब्ध नाही.

२.      फक्त एका device वरुन दुसऱ्या device वर आपले whatsapp अकाउंट बदलता येते. तुम्ही दुसऱ्या अकाउंटवर गेलात की पहिल्यातून आपोआप log-out होता.

३.      Two-step verification हे whatsapp चे सुरक्षा कवच आपल्यापैकी बरेच जण वापरत नाहीत. ते वापरणे आवश्यक आहे.

४.      कुठल्याही प्रकारची वैयक्तिक माहिती, OTP, घरचा पत्ता, पीन कोड वगैरे whatsapp वर (अगदी आपल्या जवळच्या माणसांनाही) पाठवण्याआधी (खरंच) कोण मागते आहे याची खात्री करून घेतली पाहिजे.

कुणाचेही नुकसान न होता, कुठलाही फ्रॉड न होता, शेवट गोड झाला असला तरी गेले दोन दिवस प्रचंड व्यस्त होते. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे यातून बाहेर पडल्यावर आता  “विजयी योद्धा” म्हणून मिरवावे वाटत असले तरी जखमेची आठवण त्रास देते. असा त्रास कुणालाही होऊ नये. सर्वांनी सजग रहावे म्हणून हा अनुभव कथनाचा लेखप्रपंच!!

वि. सु. जर whatsapp संदर्भात काही प्रॉब्लेम झाला तर खालील लिंकवर संपर्क साधा:

Grievance_officer_wa@support.whatsapp.com

आणि

support@whatsapp.com