Wednesday, 26 May 2021

'पाव'लेली (की 'पाव'ल्याली?) मुंबई

 मुंबईत नोकरी मिळाली या कल्पनेनेच मी एकदम हरखून गेलो होतो.

तसे हे शहर मला नवीन नसले तरी “प्रवासी” म्हणून मुंबईत येणे आणि आता “रहिवासी” बनून येणे यात फरक होता. थोडं दडपण होतं. सुदैवाने माझ्या दूरदर्शन मध्ये काम करणा-या एका मित्राच्या ओळखीने ठाण्यात पेईंग गेस्ट म्हणून जागा मिळाली. ऑफीस अंधेरीत आणि फॅक्टरी भिवंडीच्या पुढे वाडा नावाच्या गावात होती. दोन्हीकडे आलटून पालटून जावं लागणार असल्याने ठाण्यात रहाणे सोयीचे होईल हे त्या मित्राने समजावून सांगितले होते.

घर ते फॅक्टरी प्रवासाला “इतका” वेळ लागतो हा पहिला धक्का होता!! कंपनीची बस होती तरी साधारणपणे जाताना दीड तास आणि येताना दोन तास लागत. सकाळी ६.५० ला बस ठाणे स्टेशन वरून निघायची आणि साडे आठ पर्यंत फॅक्टरीत पोहोचायची. त्या दरम्यान बरीच मंडळी आपली रात्रीची शिल्लक राहिलेली झोप पूर्ण करत. या वेळेत माझे एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचून होत असे.

साडे आठ पर्यंत फॅक्टरीत पोचलो की प्रवेशद्वाराच्या जवळच मोठ्ठे कॅन्टीन होते. तिथे नाश्ता करून मग नऊ वाजता शिफ्ट सुरू होई. दुपारी साडेबारा ते दीड या जेवायच्या वेळी आणि नंतर दुपारी चार नंतर पाच वाजता शिफ्ट संपेपर्यंत चहा-नाश्त्यासाठी कॅन्टीन उघडलेले असायचे. फॅक्टरीत कामगार आणि अधिकारी अशी दृश्यं स्वरुपात विभागणी होती. कामगारांची युनियन होती. त्या युनियनचे अध्यक्ष कधी कधी फॅक्टरीत येत. मागे-पुढे एकेक उघडी जीप आणि मध्ये काळ्या काचा असलेली पांढरी गाडी..असा ताफा गेटवरुन आत आला की वातावरण एकदम ‘टाइट’ होत असे. बरं, हे अध्यक्ष महोदय कंपनीत शॉप फ्लोअर वर फिरतानाही त्यांच्या मागे दोन बंदुकधारी बॉडीगार्ड असत. (आजकाल हे महोदय महाराष्ट्राचे माननीय आमदार आहेत!!). त्यामुळे हे अध्यक्ष फॅक्टरीत आले की कामगारांच्या उत्साहाला उधाण येई तर फॅक्टरी मॅनेजर आणि त्यांच्यासोबत व्यवस्थापन (General administration) करणारी मंडळी सतर्क होत असत.

अशाच एका दिवशी, युनियन अध्यक्ष आले असताना मला मिटिंगमध्ये बोलावणे आले.

 ‘मी काय केलंय?’, ‘माझा कुठल्या कामगारांशी वाद झालाय का? मी कुणाला काही बोललोय का?’ हे सगळं आठवत आणि ‘मला कशाला बोलावलंय?’ असा प्रश्न चेहेर्यावर ठेवतच मी मिटींगरूममध्ये प्रवेश केला. समोर फॅक्टरी मॅनेजर, काही वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत युनियनचे अध्यक्ष, फॅक्टरीतले युनियन लिडर्स सगळे बसले होते. माझ्या सोबतीला माझ्यासारखे एक-दोन ऑफिसर्स होते. वातावरण गंभीर होते.

कदाचित माझ्या कपाळावरच्या आठ्या फॅक्टरी मॅनेजरच्या नजरेस पडल्या असाव्यात. त्यांनी मला विचारलं, “मंदार, बॅचलर हो ना?” मी अजून घाबरलो! (मनात) म्हटलं, “आता हे काय नवीन ‘लफडं’??”  सावंत नावाचा एक युनियन लिडर माझ्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. त्याला माझी अवस्था (की व्यथा) कळाली. तो हसत हसत साहेबांना म्हणाला, “सर, क्यूँ परेशान कर रहे हो उसको? ये टिफीन नहीं लाता है, इधरही कॅन्टीन में खाता है..!!”

मग साहेब म्हणाले, “ठीक है.. मंदार, कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर, रोज का मेन्यू और उसकी क्वालिटी मॉनिटर करने के लिए हमने एक कमिटी बनायी है.. परचेस की तरफ से इसमें तुम मेंबर रहोगे. जल्दही शर्मासाहब आप सभी कमिटीकी मिटींग बुलाएंगे”.

हुश्श!! इतकंच होतं!! “ओके, थॅन्क्स” म्हणून बाहेर पडलो. 

दोन-तीन दिवसांनी कमिटीची मिटींग झाली. चार कामगार प्रतिनिधी, दोन अधिकारी, शर्मा साहेब, त्यांच्या हाताखालचा एक अधिकारी असे आम्ही आठ जण होतो. फॅक्टरी मॅनेजर कमिटीचे अध्यक्ष होते, पण ते कधीच मिटींगला आले नाहीत.

सर्वसाधारण मेन्यू ठरलेलाच होता…वडा-पाव, सामोसा, इडली-सांबार, मेदू वडा, पोहे वगैरे नाश्त्यासाठी आणि रोटी, भाजी, भात, रोज एक स्वीट पदार्थ असा जेवणासाठी अशा मेन्यू मधून कुठल्या दिवशी काय इतकेच ठरवायचे आहे, असा माझा कयास होता. आणि फॅक्टरी पुण्यात नसल्यामुळे ‘संकष्टीच्या दिवशी खिचडी आणि ताक हवेच!’ असंही कुणी म्हणण्याची अपेक्षा नव्हती!! त्यामुळे मिटींग सहज पार पडेल असे वाटले होते.

मेन्यू ठरला होताच. मला शर्मा साहेबांनी त्यावरून नजर फिरवायला सांगितली. माझ्यातला पर्चेस मॅनेजर जागा झाला…मी म्हणालो, “इडली, समोसा वगैरे ज्या दिवशी आहे, त्यादिवशी ‘पाव’ कशाला??” इतकं पुरेसं होतं. मिटींगचा नूरच पालटला.. युनियन लिडर एकदम चवताळले… “अरे, हमारा मजदूर मेहनत करता है, आप उसके खानेपे उतर गए आज? उसको पेटभर खानेका भी अधिकार नही दोगे??”… मला काहीच कळत नव्हते की नेमके कुठे चुकले आहे!! शर्मा साहेबांनी स्वतःचा अधिकार वापरून मिटींगचा मूड ठीक केला. रोज “पाव” अनिवार्य ठरवला गेला… अगदी दुपारच्या जेवणातही जर कुणाला रोटी नको असेल तर त्याला ‘पाव’ द्यायचे ठरले!!

पण मला कळत नव्हते की हा ‘पावाचा” आग्रह कशासाठी?? 

मिटींग संपली….दुपारी मी आणि माझा एक सहकारी चहा प्यायला गेलो. मी त्याला वरचा किस्सा सांगितला..तो जोरजोरात हसायला लागला. मला म्हणाला..तुम मुंबईमें नये लगते हो..’पाव’ मुंबई का मेन-फूड है..जैसे साऊथमें राईस वैसे मुंबई में ‘पाव’!!..देख लेना लोग कैसे और किसके साथ खाते है पाव!!

आणि खरंच, पुढचा एक आठवडा मी पहात होतो.. मुंबईकर पाव कसे खातात??... वडा-पाव हा अगदीच मामुली प्रकार होता!!

खरंतर जरी बटाटे-वडा तोच असला तरी सोबत शेंगा चटणी आली की तो सोलापूरचा असतो, (कट) सांबाराच्या बाउलमध्ये बुडून आला की  कोल्हापुरचा असतो, खोबर्याच्या चटणीसोबत आला तर कर्नाटकी असतो, नागपुरात त्याचा “बोंडा” होतो आणि कापलेल्या पावात कोंबला की मुंबईचा असतो!!

असो.. तर पुढच्या एका आठवड्यात मला कळले की पावासोबत काय काय खाता येईल!!! कापलेल्या पावात वडा कोंबून “वडा-पाव” इथवर ठीक होतं..पण पावात कधी सामोसा कोंबला गेला तर कधी चक्क कांदाभजी!!! यावरून मला खात्री होती की आता ‘इडली’ पण नक्की घुसमटणार पावामध्ये!! पण नशिबाने ज्या दिवशी मेन्यू मध्ये इडली होती त्यादिवशी पाव सांबारात बुडवून खाल्ले गेले आणि इडलीला चटणीची सोबत मिळाली!!

हळूहळू पाव हे सर्वमान्य आणि सर्वत्र कधीही मिळेल असे मुंबईचे अन्न आहे यावर माझा विश्वास वाढू लागला होता. जर ‘लोकल ट्रेन’ ही मुंबई ची लाईफ लाईन असेल तर ‘पाव’ हा मुंबई चा ‘ऑक्सिजन’ आहे, याची खात्री पटली.

या मुंबईतील वास्तव्यात अगदी इडली किंवा पोह्यासोबत नसले तरी कधीतरी रोटी ऐवजी पाव खायला मी सरावलो होतो. 

मला आता ‘पाव’ खरंच पावला होता…मी मुंबईकर होण्याची ती सुरूवात होती.

*********


Saturday, 22 May 2021

लाईफ टाईम परफेक्ट पुणेकर

 पुण्यातील गोष्ट आहे..२००२-३ सालीची.

सकाळी साडेनऊच्या आसपास ऑफीसात पोचलो. छोट्याशा ऑफीसमध्ये रिसेप्शनमध्येच कस्टमर केअर सेंटरला काही जागा दिली होती. तिथे कस्टमर यायचे, आपल्या तक्रारी घेऊन. आणि आमचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह त्या तक्रारी निवारण करायचे. कधीतरी एखादा कस्टमर गरम व्हायचा, मग वातावरण टाईट व्हायचं. पण नेहमी या भागात वर्दळ असायची. तशीच त्यादिवशी ही होती. कुणीतरी आजोबा जोरजोरात आमच्या एक्झिक्युटिव्हशी वाद घालत होते. आणि आश्चर्य म्हणजे आजुबाजुचे लोक गालातल्या गालात हसत होते. थोडे विचित्र वाटले, पण तो आपला प्रांत नाही म्हणून दुर्लक्ष करुन पुढे आपल्या कामाच्या जागी आतमध्ये निघून गेलो.

दोन दिवसांपूर्वीच कंपनीने नवीन प्लॅन आणला होता. त्याकाळी मोबाईलच्या बीलामध्ये मासिक भाडे आणि केलेल्या कॉल्स चा खर्च अशी आकारणी व्हायची. इनकमिंग कॉलचा चार्ज रद्द झाल्यानंतरचा हा काळ. साधारणपणे दीडशे रुपये मासिक भाडे आणि वरती शंभर-दोनशे रुपयांचे कॉल्स असे तीनशे रुपयांपर्यंत बील व्हायचे. याऐवजी कंपनीने ‘मासिक ₹ १६९ भरा आणि आयुष्यभर (lifetime free) फोन वापरा' अशी स्किम काढली होती. भारतात अशी (त्याकाळात) पहिलीच स्किम असल्याने खूप गवगवा होता.. अर्थात जाहिरात पण जोरात होती…पण हा एकदम झालेला बदल पचवणे सगळ्यांनाच कठीण होते..

नुकसानीत चालणारी कंपनी आता अजून नुकसानीत जाईल अशी दबक्या आवाजात कर्मचारी वर्गाला भीती होती. कस्टमरला ‘कंपनी अजून काही मागच्या दाराने पैसे उकळणार नाही ना?’ याची खात्री करून घ्यायची होती.. त्यामुळे त्या काळात कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह प्रचंड कामात होते..असेच त्या दिवशी असतील असे समजून मी माझ्या नेमस्त कामात व्यस्त होतो.

दुपारी जेवायच्या टेबलवर सोबत कस्टमर केअरचा मॅनेजर होता. मी सहज विचारले, “सकाळी काय गडबड होती रे, मिलिंद?”.. त्यालाही लगेच आठवले नाही..मग मी त्याला मी पाहिलेले वाद घालणारे आजोबा, आजुबाजुला हास्याची फुसफूस हे सांगितले. हे ऐकल्यावर तो म्हणाला, “अच्छा, ते होय! काही विचारू नकोस!! अरे, आपण १६९ भरा आणि लाईफ टाईम फ्री कॉल करा अशी स्किम सुरू केली आहे ना, त्यावर त्या काकांचा आक्षेप होता की आयुष्यभर फ्री कॉलींग करायचं पण आयुष्य कुणाचे कंपनीचे की कस्टमरचे??”..

आम्ही खूप हसलो आणि एकाच निष्कर्षाप्रत आलो…

“पुण्यात एकदम परफेक्ट असावं लागतं, बाबा!!”

*********


Thursday, 20 May 2021

विकत घेताना (भाग-२).... (देशी)

 विकत घेताना (भाग २)…. (देशी)

वैविध्यतेने नटलेल्या आणि परंपरांचे पाईक असलेल्या आपल्या भारत देशात विक्रेत्यांचेही निरनिराळे प्रकार आहेत.

मला तर असं वाटतं की नेहरूंच्या काळात जशी भाषावार प्रांतरचना झाली तशीच विक्रेते-वार प्रांत रचना विसाव्या शतकाच्या शेवटी झाली असती. फक्त त्यासाठी भारतात उदारीकरण करणारे नरसिंह राव अजून एक टर्म पंतप्रधान असायला हवे होते!

काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून कोलकत्यापर्यंत प्रत्येक विक्रेत्याचं एक स्वतंत्र ”शास्त्र असतं”. ते एकदा समजलं की व्यवहारात खूप मजा येते.

सहलीला गेलेले कुटुंब-कबिले दिल्लीच्या विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर  ‘एक पे चार फ्री’ वाल्या गालिच्यांच्या वळकटीसकट पाहिले की ही मंडळी ‘काश्मिर-रिटर्न” आहेत हे लगेच लक्षात येते.

काश्मिरपासून झंझावाती सुरू झालेली ही ‘विक्रेता-गिरी’ जसजसे आपण खाली जाऊ तसतशी कमी होत जाते. केरळ/तामिळनाडूचा विक्रेता आपलेच सामान विकायला हात आखडता घेतो किंवा फक्त आपल्याला हव्या असलेल्या (selective) खरेदीदारालाच विकतो. तर अरबी समुद्राच्या काठी मुंबईतला/गुजराती विक्रेता हा आपला माल उजवायला अत्यंत ‘उजवा’ असतो. पण आपण जसजसे उजवीकडे सरकत राहू तसा हा ‘उजवेपणा’ कमी होतो आणि बंगालच्या उपसागराच्या जवळ तर अगदी ‘डावा’ होऊन जातो!!

काश्मिरी माणूस हा भारतातील सर्वोत्तम विक्रेता आहे यात अजिबात शंका नाही. काश्मिरी विक्रेता हा विकत घेणार्यांचा आधी ‘अभ्यास’ करतो. त्यांची मर्मस्थाने जाणून घेतो आणि मग विकायला येतो. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास दल-लेकच्या किनारी बरेच होडीवाले आपल्याशी व्यवस्थित मराठी बोलतात.

तर ‘पहाडी’ विक्रेता हा विकायच्या बाबतीत तितकाच काटक असतो. तो कमी गोड बोलेल पण कस्टमरला चिकटून राहतो. सोडत नाही. वैष्णव देवीच्या मंदिरात जाताना तुम्ही नाकारललेले सगळे ‘पिठ्ठू’ तुमच्या बरोबर बराच काळ चालत रहातात. हा त्यांचा चिवटपणा!!

माझ्या मते 'सरदारजी' हा भारतातला सर्वात हुशार विक्रेता आहे. त्यांच्या नैसर्गिक आक्रमक स्वभावामुळे सुरुवातीलाच खरेदी करणारा ‘बॅकफूटवर’ जातो. त्यांची धंद्याची गणितं एकदम पक्की असतात. विनवण्या करून आपला माल खपवणारा सरदारजी विक्रेता कुठेही आढळणार नाही.

राजस्थानी विक्रेता हा नेहमी ‘हल्दी घाटी’ तून आल्यासारखा व्यवहार करताना आढळतो. काहीही झाले तरी तो आपले मैदान सोडत नाही. (कार्पोरेट भाषेत यालाच : the battle is not over yet as I have not won still  असे म्हणतात). डील संपल्यानंतरही ‘हमारा कोटेशन एक बार देखो, सर’ म्हणणारा विक्रेता बहुतेक वेळा ‘राजस्थानी’ निघतो. कदाचित त्यामुळेच आपल्या अवतीभवती असणारी किराणा मालाची दुकाने पहा..कधीही बंद झालेली किंवा डबघाईस आलेली आढळत नाहीत.

गुजराती पण असाच, फक्त तो खूप गोड असतो -अति गोड!! “मिठास वाणी आणि धंदा-पाणी” याचे गणित मनात पक्के असते त्याच्या!

दक्षिणेकडील मंडळी बोलतानाच दचकतात.. कदाचित माझ्याशी हिन्दी बोलावं लागेल किंवा माझं इंग्रजी ऐकायला लागेल - अशी दुहेरी भीती त्यांचा चेहरा स्पष्टपणे दाखवते! माझ्या दिल्लीच्या वास्तव्यात तेव्हा पांढरी शुभ्र लुंगी, पांढरा शर्ट, पांढरी चप्पल, कपाळावर पांढरा टिळा लावलेली आणि पाचही बोटात अंगठ्या, हातात ब्रेसलेट, गळ्यात चमकणारी चेन घातलेली मंडळी आम्हाला भेटायला येत असत. येताना भारत सरकारच्या लेटरहेडवर शिफारस पत्र आणत. आणि आम्हाला प्रेमळ धमकावत… 

“साssर, we are from Minister’s constituency and want to work with your good company in Chennai.” 

मग आम्ही त्यांना आमच्या चेन्नईच्या टीमकडे पाठवायचे आणि त्या टीमने आमच्याकडे असा खो-खो काही काळ चालत राही.

कलकत्त्याच्या विक्रेत्यांशी बोलताना काहीही झाले तरी मिटींग एका दमात संपवावी!! मध्ये ब्रेक घेण्याची चूक करू नये. नाहीतर डाव‌ हल्लाच म्हणून समजा!! तो कलकत्तावासी मधल्या ब्रेकमध्ये निकोटीन भरुन येतो आणि नंतर (माझ्यासारख्याला) त्या मिटींग रुममध्ये बसणे अवघड होते!! (‘मास्कचा वापर' आणि ‘दो गज दूरी' या संकल्पनेनंतर ऑफीसात बसून निगोसिएशन्स केलेले नाहीत! कदाचित वेगळा अनुभव येऊ शकेल)

हैद्राबादी विक्रेता कधीही आपल्या प्रॉडक्ट ची किंमत हलवत नाही. त्यामुळे त्यांच्याशी ‘negotiation’ कठीण असते.

आपले पुणेरी विक्रेते धमाल असतात. त्यांना प्रॉडक्टचे टेक्निकल ज्ञान अफाट असते. प्रत्येक गोष्टीचा कीस काढण्याची मध्यमवर्गीय सवय negotiations मध्ये डोकावणार याची खात्री असते!! व्यवसायासाठी पुण्याहून मुंबईला प्रवास करणारे पुणेकर विक्रेते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत मिटींग संपली नाही आणि पुण्यात परतायला उशीर होणार हे जाणवले की सैरभैर झालेच म्हणून समजा!!

काहीही असले तरी ही सगळी मंडळी शेवटी मुंबई आणि दिल्ली इथे येऊन मिसळतात कार्पोरेट विक्रेत्यांची मुंबई आणि दिल्ली ही दोन महत्त्वाची तिर्थक्षेत्रं आहेत. आणि त्या दोन्ही क्षेत्रांच्या विकण्याच्या पद्धतीत ‘वारकरी’ आणि ‘सोवळे-करी’ इतका फरक आहे!

सकाळी सात बावन्नची लोकल पकडून ऑफिसला येणारा मुंबईकर विक्रेता हा सरळमार्गी असतो. उत्पादन, त्याची किंमत, त्याचे स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टींबद्दल त्याला पूर्ण माहिती असते. बाकीच्या इतर गोष्टींची त्याला फिकीर नसते. त्याची मिटींग ही ठरलेल्या वेळेनुसार संपते. आणि त्याला ऑर्डर मिळो अथवा न मिळो तो संध्याकाळी सहा सत्तावीस ची लोकल पकडून घरी जातो. याउलट दिल्लीकर आरामात दुपारी येतात. कितीही वेळ वाट बघत रिसेप्शनमध्ये बसू शकतात. प्रत्यक्ष मिटींगमध्ये काही प्रश्न विचारले तर ‘हमारे एक्स्पर्ट को कल भेज देता हुं, आप पुंछ लो जो चाहिए वो’ असं उत्तर देतात. 

या प्रकाराला माझ्या दिल्लीच्या सुरूवातीच्या कार्यकाळात मी इतका वैतागलो होतो की शेवटी बॉसकडे तक्रार केली तेंव्हा तो म्हणाला, ‘धीरे धीरे आदत हो जाएगी. पेशन्स रखो’!!

मला भेटायला येणारा जवळजवळ प्रत्येक विक्रेता ‘आप पहिली बार दिल्ली आए हो? कुतूबमिनार देखा? इंडिया गेट घुमने चलते है….’ वगैरे वगैरे. फाफटपसारा बोलत वेळ घालवायचा.  याउलट मुंबईतल्या विक्रेत्याला तुम्ही ‘गेटवे ऑफ इंडिया' किंवा ‘म्हातारीचा बूट’ बघितला आहे की नाही यात काडीचाही रस नसतो. 

मुंबईकर फोन करेल. आपले प्रॉडक्ट थोडक्यात सांगेल. मिटींगची वेळ घेईल आणि त्यावेळेत येऊन आपल्याकडची सगळी माहिती देऊन‌ चर्चा करेल आणि ऑर्डर घेऊन अथवा न‌ घेता धन्यवाद देऊन निरोप घेईल.

दिल्लीकर फोन करेल. “साब, आज क्या प्लॅन है? बहुत दिन हो गये आपके साथ चाय पीके?? कब बुलाओगे?? (यात ‘चाय’ हे मला रूचणारे आणि पचणारे पेय आहे. बाकीच्यांना आपल्या आवडीनुसार वाचण्याची मुभा आहे!!).

माझा एक मुंबईचा विक्रेता मित्र माझ्याच काळात गुरगावला नोकरीसाठी आला होता. काही दिवसांनी कुटूंबासह आम्ही घरी भेटलो. ‘तू मुझे सुना, मै तुझे सुनाऊ’ शैलीतील त्या गप्पांमध्ये त्याने सांगितलेला किस्सा अफलातून होता. तो म्हणे, “मी कंपन्यांमध्ये फोन करतो, तर दरवेळी पर्चेसचे साहेब मिटींगमध्ये असतात. जर भेट झाली तर प्रॉडक्ट, स्पेसिफिकेशन्स मध्ये त्यांना अजिबात रस नसतो. त्यामुळे दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिटींग होत नाही. सेल तर दूरच पण विकत घेण्याची संधी (opportunity) पण दिसत नाही. दुसर्या बाजूने बॉस ढकलतो ‘जा, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैस. कस्टमर सोबत जेवण कर. त्याला गुंतवून ठेव. रिलेशनशिप बनाओ'. आता जर कस्टमरला माझ्या प्रॉडक्ट मध्येच रस नसेल तर मी चहा पिऊन काय फायदा?” 

पण एव्हाना मी रूळलो होतो त्यामुळे मी त्याला हा “सांस्कृतिक” फरक समजावून सांगितला. तो त्याला पटला आणि नंतर तोही मग कधी-कधी मला फोन करून ‘चाय पीनी है’ म्हणायला लागला!!

खरंतर, विक्रेत्यांचा मूळ स्वभाव आणि त्यांच्या कंपनीचा स्वभाव यांच्या मिश्रणातून एक रसायन जन्माला येते. ते कितीही वेगवेगळं असलं तरी ‘डील जिंकणं’ हाच प्रत्येकाचा मोक्ष असतो. भले प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल कदाचित!!

माझ्यासारख्या नेमस्ताला हे सगळे विक्रेते जवळून अनुभवता आले. विकण्याच्या पद्धतींशिवाय प्रत्येकाची सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण, त्यांच्या प्रदेशातील उद्योग, कुटुंब व्यवस्था, खान-पानाच्या सवयी हे सगळे समजून घेता आले. माझ्या मैत्रीच्या भौगोलिक कक्षा रुंदावल्या. त्यांच्यासोबत ‘बिहू”, उगादी, बैसाखी आदि साजरे करता आले. ही मंडळी सुद्धा गणेशोत्सवाचा भाग झाली.

त्यातूनच मला विविधतेने नटलेल्या भारताचे दर्शन झाले आणि पर्चेस सारख्या thankless profession चा आजपर्यंत भरपूर आनंद लुटता आला.


*****



 


 


हनुमान इंजिनिअरिंग

 बायकांची साडी खरेदी आणि बॉसला द्यायची माहिती हे दोन्ही एकाच माळेचे मणी!! दोन्ही ठिकाणी तुम्ही कितीही वैविध्यपूर्ण ज्ञान पाजळले तरी अंती समाधानाची खात्री नाही. 

बॉस एखाद्या कामाची माहिती आपल्याला मागतो. तुम्ही ती देता. मग त्यावर काहीतरी स्पष्टीकरण हवे असते. मग ते देता-देता अजून काही फाटे फुटतात आणि मग अजून माहिती…अजून स्पष्टीकरण…हे प्रत्येक ऑफिसमध्ये घडणारे दृश्य आहे. त्यावरचा सर्वमान्य उपाय म्हणजे बॉसने मागितलेल्या माहिती पेक्षा थोडी अधिक माहिती पुरवायची!! हे इतके सहज होते की आपल्याला कळत नाही जसे की एक साडी घेताना शंभर साड्या पाहिल्या जातात!!

जर आपण बॉस असू आणि आपल्या हाताखालचा सहकारी जेंव्हा आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतो तेंव्हाही हे जाणवते की मागितलेल्या माहिती पेक्षा जास्ती मिळाले आहे.

यात मायक्रोसॉफ्ट विंडोज सॉफ्टवेअरने आणखी भर घातली आहे. आता जी माहिती उपलब्ध असेल त्याची स्प्रेड-शीट बनवली जाते. हे म्हणजे २१ अपेक्षित नवनीत गाईडच!! 

त्यामुळे देणारे आणि घेणारे दोघेही या प्रकारात एकदम पारंगत असतात. पण यात एखादा जर वेगळा असेल तर मात्र गंमत येते.

माझ्या एका बॉसच्या बाबतीत हा प्रकार सतत घडत असल्याने त्याने त्यावर आपल्या पद्धतीने उपाय शोधला, त्याची ही गोष्ट!!

हा ‘बॉस' म्हणजे जगातला सर्वात unpredictable माणूस!! माझी आजी अशा माणसांचे वर्णन “वाहिली तर गंगा, नाहीतर तीर्थालाही मिळणार नाही’ असे करत असे.  बॉसचा मूड ओळखायला आम्ही ‘लिटमस टेस्ट' वापरायचो. म्हणजे काय, सकाळी ऑफिसला येताना त्यांना अख्खी टीम ओलांडून मग स्वतः च्या केबिनमध्ये जावे लागे. वाटेत जो कुणी भेटेल त्याने “गुड-मॉर्निंग” म्हणायचे. उत्तरात “गुड मॉर्निंग” आले तर ‘मस्त मुड’! कधी कधी “गुड मॉर्निंग” चे उत्तर “ओके” असेही यायचे…म्हणजे ‘ठीक-ठाक’ मुड – परिस्थिती तणावपूर्ण किंतु नियंत्रण में!! आणि जर आपल्या ”गुड मॉर्निंग”ला उत्तरंच आले नाही तर समजायचे की आज “रेड एलर्ट”!! बॉसच्या नजरेत न येता दिवस ढकलणे!!!

तर अशाच एका ‘तणावपूर्ण किंतु नियंत्रण में’ दिवशी दुपारी मला केबिनमध्ये बोलावणं आलं. लगेचच डायरी घेऊन मी गेलो तर एक सहकारी तिथे आधीपासूनच बसला होता. त्याला नजरेनेच विचारले, “काय भानगड?” त्यानेही नजरेनेच सांगितले, “अवघड आहे पण अशक्य नाही”. नंतरचा अर्धातास मी बॉसच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. कठीण पीचवर पहिली पंधरा अनिवार्य षटके मी खेळून काढली होती. भले धावा जास्त निघाल्या नसतील पण विकेट गमावली नव्हती!! आता माझा सहकारी खेळणार होता. पहिलाच प्रश्न: “बिहार के हमारे टॉवर्स का average ईलेक्टीसीटी बिल कितना है?” उत्तर आले, “सर सुबह मैने आपको ई-मेल किया है”.

बस्स!! ठिणगी पडली!! आणि मग मला एकेक गोष्टींचा उलगडा होत गेला.

सकाळी आठ वाजता बॉसने हाच प्रश्न माझ्या सहकाऱ्याला विचारला होता. तेंव्हा तो सहकारी मॉर्निंग वॉक करत होता. म्हणून त्याने बॉसला तसे सांगितले आणि ‘पंधरा मिनिटांत सांगतो' असे आश्वासन दिले. पुढच्या क्षणी त्याने आपल्या हाताखालच्या अधिकार्याला ताबडतोब ऑफिसला बोलावले.

अर्ध्या तासाने बॉसने पुन्हा फोन केला आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला तेंव्हा महाशय म्हणाले “गाडी चालवतोय, ऑफिसला पोचतो आणि माहिती देतो.”

महाशय ऑफीसात पोचले, बोलावलेला हाताखालचा सहकारी आधीच पोचला होता. दोघांनी मिळून एक एक्सेल शीट बनवली आणि बॉसला पाठवली.

थोड्या वेळाने बॉसच्या पुन्हा फोन आला. पुन्हा तोच प्रश्न “बिहार के हमारे टॉवर्स का average ईलेक्टीसीटी बिल कितना है?”  यांनी सांगितले ई-मेल पाठवला आहे.

आता पुढे बॉसच्याच शब्दात (मराठीत):

मीपण ऑफिसला येत होतो. गाडीतच फोनवर या सद्गृहस्थाने पाठवलेला ई-मेल उघडला. याने इतकेच लिहिले होते – तुमच्या माहितीसाठी (अर्थात - FYIP). म्हणजे माहिती कुठेतरी होती, पण ती शोधा!! मग ई-मेल वर सरकवला. खाली एका अधिकाऱ्याने याला ई-मेल लिहीला होता. त्यात लिहीले होते की तुम्ही मागितलेली माहिती खालीलप्रमाणे…!! पुन्हा थोडे खाली गेलो.. बिहारच्या बिझनेस हेड ने लिहीले होते- आपण फोनवर बोलल्याप्रमाणे मी माहिती पाठवत आहे. काही शंका असल्यास विचारा…माहिती कुठेच नव्हती…ई-मेलच्या शेवटी एक स्प्रेड शीट होती. ती उघडली तर माहितीचा स्फोट झाला त्यात चार हजार टॉवर्स चे दर दिवसाचे इलेक्ट्रीकल मिटरचे रिडींग लिहीले होते. शेवटी त्या सगळ्यांची बेरीज केली होती. – सरासरी कुठेच नव्हती!!

मंदार, आता मला सांग, की एक साधा प्रश्न सरासरी बिल किती? - हजार, पाच हजार, दहा हजार असा एक अंक मला हवा होता. तो फोनवर, एस् एम् एस् वर पाठवण्यासारखा होता. त्यासाठी २०० कॉलम आणि ३०० रो असलेली एक spreadsheet मिळाली. त्यासाठी सहा तास आणि दहा फोन कॉल्स खर्च झाले. समाधानकारक उत्तर अजूनही मिळाले नाही. आणि हा म्हणतो मी ई-मेल पाठवला!!

या पद्धतीला काय म्हणतात माहिती आहे? मी नकार दिल्यानंतर मला सांगितले याला म्हणतात “हनुमान इंजिनिअरिंग”!!! अर्थात – “मी सगळी माहिती दिली आहे, आता शोधा काय हवे ते!!”

मला पटलं. या “हनुमान इंजिनिअरिंग” ने माझ्या कॉर्पोरेट जीवनात घर केले. मी या सगळ्या प्रकाराकडे हसत खेळत पाहू लागलो.

आता माझ्या घरीही ‘हे’ इंजिनिअरिंग सर्रास वापरले जाते. परवा माझ्या मुलीचा on-line चित्रकलेचा क्लास सुरू होता. पसारा करून बाईसाहेब कॉम्प्युटर समोर बसल्या होत्या. अचानक मला आदेश आला, “बाबा, माझी पेन्सिल त्या खोलीतून आणून दे”. मी उठलो. दुसऱ्या खोलीत जाता जाता विचार केला. हिने आत्ता पेन्सिल मागितली, मग खोडरबर मागेल, मग पट्टी, कलर्सचे ब्रश वगैरे पण लागतीलच. मी तिचा ड्रॉइंग बॉक्स उचलला आणि तिला नेऊन दिला. तिने माझ्याकडे पहात एक हसत कटाक्ष टाकला आणि म्हणाली, “बाबा, मी पेन्सिल मागितली आणि तू बॉक्स दिलास….इट इज हनुमान इंजिनिअरिंग!!”

*****

एस् टी डी फोन

 एस् टी डी फोन

माझी पहिली नोकरी औरंगाबादमध्ये होती. आमची कंपनी शहराच्या बाहेर बीड रोडवर 30-35 किलोमीटरवर एका खेडेगावात होती. रोज सकाळी कंपनीच्या बस मधून आठ वाजता तिथे पोचायचे आणि संध्याकाळी पाच वाजता तिथून निघून परत औरंगाबाद शहरात घरी यायचे असा दिनक्रम असायचा. मधल्या वेळी काही अत्यावश्यक कामासाठी शहरात जाण्यासाठी किंवा शहरातून येण्यासाठी शटल-सेवा होती. दररोज सकाळी दहा वाजता एक शटल कंपनीतून निघे आणि औरंगाबादच्या क्रांती चौकातल्या ऑफीसपर्यंत जाई. तेच तिथून परत बारा वाजता निघे आणि कंपनीत येई. असेच दुपारी अडीच वाजता आणखी एक शटल कंपनीतून निघत असे.

आम्हा पर्चेसच्या मंडळींना हे शटल म्हणजे ऑक्सिजन होते. कारण कंपनीत फोन नव्हते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातील लॅन्डलाईन खेडेगावात पोचण्याच्या आधीचा तो काळ!! त्यामुळे सप्लायर मंडळींना कंपनीतून फोन‌करून आपल्या पर्चेस ऑर्डर नुसार येणाऱ्या सामानाचे अपडेट घेणे शक्य नव्हते.  रोज सकाळी कंपनीत जाऊन आपापल्या सामानाच्या परिस्थितीचा (शॉर्टेजेसचा) आढावा घ्यायचा आणि मग दहा वाजता शटल पकडायचे आणि एस् टी डी बूथवरून सप्लायर्सना फोन‌ करायचे आणि सगळे अपडेट घेऊन बारा वाजताच्या शटलने परत कंपनीत!! काही मंडळी दुपारपर्यंत कंपनीत थांबून अडीचचे शटल पकडत असत आणि शहरात जाऊन एस् टी डी बूथवरून फोन्स करत आणि मग घरी जात. तर काहीजण सकाळी बारा वाजेपर्यंत सप्लायर्सना फोन करत आणि मग कंपनीत येत.

फोन करण्यासाठी ठराविक दोन-तीन एस् टी डी बूथ नेमस्त होते. तिथे बिलावर क्रेडिट असल्याने - फोन करा, बिल घ्या, तिथल्या रजिस्टर वर नोंद करा आणि कंपनीत बिल क्लेम करा. कंपनीतून पैसे मिळाले की बूथवाल्याला द्या – अशी सर्वसाधारण पद्धत होती.

यात मजा व्हायची. कधीकधी एका पार्टची तजवीज करून बारा वाजता शटलने ऑफीसात जा आणि तोवर दुसर्याच पार्टचे शॉर्टेज यायचे मग परत अडीच वाजता शहरात या आणि सप्लायर्सना विनवणी चे फोन करत रहा. 

त्यावेळी आमचे एक मॅनेजर नुकतेच कंपनीत आले होते. पुण्याहून आलेल्या या साहेबांना हा “फोन” प्रकार नवीन होता. कच्च्या मालाची अडचण समजल्यावर पटकन् फोन उचलून सप्लायर्सशी बोलण्याची इथे सोय नव्हती. पुढच्या शटलपर्यंत थांबण्याशिवाय पर्यायही नव्हता. यात अजून एक भर म्हणजे बुथवर जाऊन केलेल्या फोनमुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती मिळेल याची खात्री नसे..मग रात्री उशिरा सप्लायर्सच्या घरच्या नंबरवर फोन करायचे आणि माहिती घ्यायची असेही प्रकार चालत.

या आमच्या साहेबांना एकदा आदेश आला – “तुमच्या ज्यूनिअर मंडळींकडून “तो एक पार्ट” लवकर येत नाही असे दिसते आहे, तेंव्हा तुम्ही स्वतः त्या सप्लायरला फोन करून आढावा घ्या.”

यांनी पार्टची आणि सप्लायरची सगळी माहिती गोळा केली. ज्या इंजिनिअरने तो पार्ट विकत घ्यायचा होता त्याच्याकडून सप्लायरच्या फॅक्टरीचा आणि घरचा टेलिफोन नंबर घेतला. रात्री फोन करून सकाळी कंपनीत आल्यावर स्टेटस अपडेट करायचे असे ठरले आणि आम्ही आपापल्या घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो इंजिनिअर साहेबांकडे गेला आणि विचारले, “सर, काय झाले बोलणे?? पार्ट कधी देतो म्हणाला आहे??”

साहेब म्हणाले, “अरे, मी फोन केला पण नंबर चुकीचा आहे असा संदेश येत होता”.

इंजिनिअर चपापला आणि म्हणाला, “सर, मी आज सकाळी सहा वाजता बोललो त्यांच्याशी, याच नंबरवर..” 

असे म्हणून त्याने नंबर सांगितला. साहेबांनी आपली डायरी उघडली आणि त्याला दाखवली नंबर तोच होता..मग कुठे चुकले??

थोडावेळ काथ्याकूट केल्यावर कळाले, “सर, हा मुंबई चा नंबर आहे. कोड “०२२” लावायला हवा. तुम्ही “०२१२” फिरवून पुण्यात फोन लावत होतात!!

साहेबांनी ‘आज रात्री बोलतो योग्य नंबरवर!’ असे आश्वासन देऊन त्यादिवशीची वेळ मारून नेली होती.

पुढच्या दिवशी सकाळी परत एकदा इंजिनिअर साहेबांकडे गेला आणि विचारले, ”सर, बोलणे झाले?”

साहेब हसत म्हणाले, “हो. आज नंबर आणि एस् टी डी कोड दोन्ही बरोबर होते!! पण तो सप्लायर घरी नव्हता, त्याची बायको होती. मी तिच्याकडे निरोप ठेवलाय.”

आता इंजिनिअरची खैर नव्हती. दोन दिवस झाले होते. परिस्थिती जैसे थे होती. त्याने दहाचे शटल पकडले आणि बुथवर आला. बुथवाल्याने नेहमीप्रमाणे त्याच्या नावासमोर कालचे साहेबांचे फोनचे बील लिहून ठेवले होते. त्याने ते पाहिले आणि त्याला धक्काच बसला. तो कॉल वीसेक मिनिटांचा होता. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते सप्लायरशी नव्हे तर त्याच्या बायकोशी बोलले होते….वीस मिनिटे??

त्याने फोन उचलला आणि आपल्या पर्चेसच्या खाक्यानुसार सप्लायरची यथेच्छ “पूजा” केली..

असो. माझी पहिलीच कंपनी होती. तेंव्हा पासून मी मात्र आजतागायत टेलिफोन नंबर हे एस् टी डी कोडसकट लक्षात ठेवायला आणि इतरांना सांगायला शिकलो. अगदी आजही माझ्या मोबाईलवर असलेल्या प्रत्येकाच्या नंबरच्या आधी “+९१” लिहीलेले असते.


- मंदार कुलकर्णी

******