मी आणि तो....
मी आणि तो -आमचे कधीच पटत नाही.
एकाच मनात रहातो आम्ही, म्हणून आमची साथही सुटत नाही.
मी म्हणतो 'सोड,जाऊ दे', तो
म्हणतो,”नाही, हे असेच राहू दे”
लॉकडाऊन सुरू झाला मला वाटले, मस्त टाईमपास!
त्याला चिंता की, 'हातावरच्या पोटाला मिळतील का रे दोन घास?”
मी म्हणालो जेव्हा की आता सुट्टीत रोज नवीन वेगवेगळे चमचमीत खाऊ!
तो म्हणे, डबे घेऊन भर उन्हात उभी शिव-भोजनाची ती रांग- दिसते का रे भाऊ?
स्वच्छ झाली हवा आता चंद्र-चांदण्यांची दिवाळीच जणू नभा,
तो मात्र आकाशाकडे नुसता शून्य नजरेने पहात उभा.
महामारीच्या भीतीने जग सारे पळते आहे..
खूप दूर झालो समजून ‘झूम’द्वारे जुळते आहे.
तो मात्र स्वत:ला यातूनही शोधत आहे
कोहम्- कोहम् म्हणत निसर्गाशीच भांडत आहे.
फुकट जेवण, फुकट औषधं आणि फुकट प्रवासही – आता सुखाने जा आपापल्या घरी
तो म्हणतो, घरी दहा खाणारी तोंडे म्हणून कमवायला आलो होतो नगरी..
सरकारही अजबच म्हणायचे-
मला म्हणते ‘घरी रहा, बाहेर जायचं नाही'.
त्याला मात्र 'जा' म्हणतात सारे, 'रहा' कुणी म्हणतच नाही.
टीव्ही पहात, पुस्तकं वाचत माझा हा ही काळ सरेल
कुटूंबाच्या ओढीने निघालेला तो मात्र कुठेतरी चिरडून मरेल.
मी म्हणालो, “मित्रा, चल थोडे हसुया का?”
तो म्हणे, “डोळे पाणावलेत, पुसूया का?”
त्याला बरे वाटावे म्हणून मी गुणगुणलो,
“..झाले गेले विसरून जावे, पुढे,पुढे चालावे. जीवनगाणे..गातच रहावे…”
तिकडून प्रतिसाद आला,…..
“हिच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…”