Wednesday, 17 July 2019

सांत्वन


एखाद्या व्यक्तीचे दुःख हलके व्हावे म्हणून तिला भेटणे, त्या व्यक्तीच्या दुःखद दिवसांत चार हलके-फुलके आनंदी क्षण देणे याला जर सांत्वन म्हणत असतील तर बहुतेकदा हे सांत्वन  करताना ते करणारी व्यक्ती  ते दुखःद क्षण कळत-नकळत इतके हलके करते की ज्याचे सांत्वन करायचे तोही बिचारा घुसमटतो!!

मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या आप्तस्वकीयांना धीर देणे हा सांत्वनातला सर्वोच्च प्रकार! त्यामुळे तो देणारे त्यात एक (गरज नसलेली) ‘आवश्यकता’(compulsiveness) बळजबरीने आणतात. ‘अरे, मला त्यांच्या घरी जाऊन त्या कुटूंबाला भेटलंच पाहीजे’ किंवा ‘पहिल्या दिवशी जमले नाही, पण दहा दिवसात एखादा दिवस नक्की जायलाच हवे’ असे संवाद आपण वारंवार ऐकतो. ‘लोक काय म्हणतील?’ या सामाजिक भितीतून ही अधीरता येत असावी. बरं, ज्या कुटूंबाचे सांत्वन करायचे आहे (ते आपण सोयीकरीता ‘यजमान कुटूंब’ म्हणूया) त्यांच्या मानसिकतेचा, दु:खाचा किंवा त्यांच्या तत्कालिन गरजांचा बट्ट्याबोळ करायलाही हे ‘सांत्वनकार’ मागे-पुढे पहात नाहीत.

अशी कल्पना करू की नव्वद-पंच्याण्णव वर्षे वयाच्या एका आजोबांचं दुःखद निधन झालंय आणि त्यांच्या पश्चात असणारी त्यांची मुलं, नातवंडं वगैरेंच्या सांत्वनाकरता त्यांच्या घरी जे लोक येत आहेत त्यातले काही निवडक प्रसंग-
सर्वसाधारणपणे, ‘कधी झाली ही घटना?’; ‘आजारी होते का? काल-परवा तर मला भेटले रस्त्यावर!’ ... अशी पहिली अनिवार्य पंधरा षटके खेळून काढली की मग सांत्वनकारांची खरी फलंदाजी सुरू होते!...
‘कुठला दवाखाना?’ या प्रश्नावर यजमानांचे ‘अबक हॉस्पिटल’ असे उत्तर मिळते आणि सांत्वनकाराला ‘फूलटॉस’ मिळाल्याचा आनंद मिळतो. ‘अरेरे...’ असे म्हणत सांत्वनकार stance घेतो, ‘अरे तिथे कशाला गेलात कडमडायला? ते एक नंबरचे लुच्चे आहेत. परवा मी साधं डोकं दुखतंय म्हणून गेलो तर काय-काय टेस्ट करवल्या. अरे, विचारू नकोस. तुला सांगतो आजकाल डॉक्टरांवर भरवसाच राहिला नाही. अरे किमान मला तरी विचारायचे! (इथे मात्र यजमान आपल्या मुठी आवळतो कारण वास्तविक हे सांत्वनकार सद्गृहस्थ भिक्षुकी करतात. पेशंटचे रिपोर्ट्स डॉक्टरांना दाखवण्याऐवजी तुम्हाला दाखवून दवाखान्यात अॅडमिट करायचा मुहूर्त काढू का? – हा प्रश्न मनातच गिळतो आणि “हो-हो, चुकलंच माझं” असं म्हणतो).

त्यानंतर हे भिक्षूक-काका ‘पुढचं कार्य कुठे करणार आहात?’ असा व्यावसायिक प्रश्न विचारतात. आता हॉस्पिटल प्रकरणात शेकले गेलेले यजमान चालाख असतील तर ‘तुम्हीच सांगा’ असं म्हणतात मग पुढच्या फलंदाजीची तयारी पूर्ण होते.
तोवर, एक वयस्कर गृहस्थ येऊन बसलेले असतात. त्यांना यजमानातील कुणीही ओळखत नसते. “फार लाघवी स्वभाव हो! एकदम मनमिळाऊ...” अशी अनिवार्य षटकं टाकून झाली तरी समोरचा दाद देत नाही हे त्यांच्या एव्हाना लक्षात येतं. मग दहा-पंधरा मिनीटे पूर्ण शांतता. यजमान मनात गयावया करतो, काका, मला पाठ टेकवू द्या ना!तर इकडे काका मनातल्या मनात निरोप घेण्याची अचुक संधी शोधत असतात. एवढ्यात यजमानाचा मोबाईल वाजतो आणि तो “आलोच” असे म्हणून आणि काका ‘आता निघतो’ असे म्हणून निरोप घेतात आणि एकमेकांची सुटका होते.

एखादा सांत्वनकार हा पुलंच्या हरितात्यांसारखा असतो. “तुला सांगतो, पुरूषोत्तमा...” असं म्हणत तो आपल्या स्वतःच्या आईच्या वेळेची कथा रंगवायला सुरू करतो. “साधं पोटात दुखायचं निमित्त रे! किती डॉक्टर, किती त्या वेगवेगळ्या टेस्ट. काही बोलायची सोय नाही. दोन वर्षे अखंड  प्रयत्न सुरू होते, पाण्यासारखा पैसा खर्च केला. सगळे नवस, उपास-तापास, व्रतं-वैकल्यं सगळं-सगळं केलं. पण यश आले नाही....” हे सांगताना तो स्वतःच गहिवरतो आणि एक वेळ अशी येते की प्रत्यक्ष यजमानच (स्वतःचे दुःख बाजुला सारून) पुढे सरसावतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो!!
या सगळ्या प्रकारात अजुन असे काही नमुने असतात ज्यांना वाटतं की यजमान कुटूंबापेक्षा माझेच दुःख जास्त आहे. “अहो, माझी नुकतीच बदली झाली आहे. रोज मला पुण्याहून लोणावळ्याला जावे लागते. दिवसाचे दोन तास फक्त प्रवासात खर्च होतात.  शिवाय थकवा वेगळा” असे एखादा गृहस्थ आपली व्यथा यजमानाला सांगत असतो. तोच घरात बसून कंटाळलेले एखादे काका त्याला लोकलचा प्रवास हा महामार्गावरच्या प्रवासापेक्षा उत्तम कसा?- हे समजावायला लागतात. “अहो, मी बावीस वर्षे लोकलने प्रवास केला. पंचेचाळीस मिनीटात लोणावळा.....काय घेऊन बसलात गाडीचे?...वगैरे,वगैरे”. वास्तविक, या गृहस्थाला स्वतःच्या  घरातून रेल्वे स्टेशनवर पोहोचायला जेवढा वेळ लागतो तितक्याच वेळात तो गाडीने लोणावळ्याला पोहोचतो. हे तो समजावून सांगतोही पण बरेच दिवस बोलण्याची (खरंतर वाद-विवादाची)  संधी न मिळालेले काका मात्र हट्टाला पेटतात आणि ट्रेनच कशी किफायतशीर आहे हे समजावून सांगू लागतात. या विवादात दोघांचाही आवाज इतका वाढतो की शेवटी प्रत्यक्ष यजमानालाच मध्यस्थी करावी लागते!

सांत्वन करायला जाणे ही सामाजिक जबाबदारी आहे अशी ठाम समजूत करून घेऊन काही मंडळी आपली वैयक्तिक जबाबदारी थोडी बाजूला ठेवून पुढे सरसावतात पण इथेच घात होतो. अशी मंडळी सांत्वनाला घरी येतानाच मोबाईलवर बोलत बोलत घरी येतात. आल्यावर यजमानाला तर्जनी दाखवून ‘एक मिनीट’ वेळ मागून घेतात. मग पाच मिनीटांनी फोनवरच्या पलिकडच्या माणसाला ‘मी तूला दहा मिनीटात फोन करतो’ असे जाहीर आश्वासन देऊन मग यजमानाकडे वळतात. यजमानाशी बोलायला सुरू करणार इतक्यातच परत फोन वाजतो. ‘सॉरी, अर्जंट फोन आहे’ असे यजमानाला सांगून फोन उचलतात. मग सुरूवातीला समोरून ऐकू येत नसल्याने स्वतःचा आवाज वाढवतात. मग लक्षात येते इथे रेंज नाही.. मग यजमानाच्या घरातले कोपरे, खिडक्या इ. ठिकाणे रेंजसाठी तपासली जातात. “....नाही मी काय म्हणतो, आत्ता एवढा एक ट्रक उतरवून घ्या. आठ दिवसात आपण बाकी सगळा हिशेब करू..... अहो, मी बाहेर आहे. इथे रेंज नाही म्हणून ऐकू येत नाही. तुम्ही उतरवून घ्या सामान.......”. मग फोन संपतो. तो बाजूला ठेवण्याआधीच पुन्हा फोन वाजतो.  हा बहुदा ट्रक ड्रायव्हरचा असावा कारण यांचा आवाज चढलेला असतो...”तुला सांगितले आहे ना? मग परत का कुरबूर?....” रेंज गेली म्हणून आता सरळ घराबाहेर जाऊन आरडाओरड!!! बोलत बोलत हे गृहस्थ आपल्या गाडीजवळ जातात. चावी लावून गाडी सुरू करणार इतक्यात लक्षात येते की चपला काढल्या त्या अजून दरवाजातच आहेत. मग परत दाराशी येऊन चपला घालत-घालत यजमानांना ‘परत येतो सवडीने, आत्ता जरा घाईत आहे’ असा निरोप दिला जातो. यजमानच त्याला ‘सांभाळून जा’ असा आशीर्वाद देतो आणि परत आपल्या घरी येऊन बसतो.

खरेच या असल्या सांत्वनांची गरज असते? की  नेमके हेच ते चार सुखाचे- ‘स्वतःचे दुःख विसरण्याचे’ क्षण??

शेवटी सुरेश भटांच्या ओळीत लिहीलंय तेच खरं –
‘लोक भेटायास आले, काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले.

-----------***---------------

पाऊस

पाऊस

पाऊस तसाही मला अगदी लहानपणापासून कधीच आवडला नाही.  लहानपणीचा पाऊस म्हणजे चिखल, दलदल, शाळेला भिजत जाणे वगैरे वैताग असण्यापेक्षाही नदीला येणारा अक्राळविक्राळ पूर, आजुबाजुला तीरावरची बुडालेली शेते, पूरामुळे संपर्क तुटलेली गावे इत्यादी गोष्टींमुळे भयावह होता.
अगदी कुणाच्या बागेत किंवा शेतात जायचे म्हटले तरी चपलांसकट पाउल उचलायला पडलेले कष्ट, चपलांना लागून (किंवा चपला न घालता गेलो तर पायाला लागून) सोबत येणारा चिखल. आजुबाजूला आपल्यापेक्षा बिनधास्त बागडणारे बेडूक, गोगलगायी, क्वचित एखाद्-दूसरा गवतातून वळवळत जाणारा साप हे सगळंच भयानक होतं.

पुढे जसजसे मोठे होत गेलो तसे मग नेमक्या वेळेला उलटी होणारी छत्री किंवा आत पाणी जाऊन ओला होणारा किंवा पाऊस येईल म्हणून घातला आणि पाऊस आला नाही की अंगातला घाम काढणारा रेनकोट, सायकलच्या रस्त्यावर असणारे पण पाण्यामुळे न दिसणारे खड्डे आणि ते जर दिसले अन् चुकवायला बाजूला गेले की शेजारून जाणार्या गाडीने घातलेले स्नान! हे सगळं-सगळं ओंगळवाणं होतं!! मोठेपणातल्या मोठ्या शहरातल्या अडचणी मोठ्या आहेतच. घरातून बाहेर पडल्यावर कधी परत घरी येईन याची शाश्वती न देणारा पाऊस ही मोठेपणातील मोठी गोष्ट.

हे सगळे स्वानुभव पाठीशी असल्यामुळे पाऊस कसा आनंद देतो हे आजवर मला समजलेलेच नाही. अगदी ‘यंदा,  माझ्या शेतीला हवा तेवढा आणि हवा तेंव्हा पाऊस पडलाय’ असे ठामपणे सांगणारा शेतकरी मला गेल्या चार-साडेचार दशकात सापडलेला नाही. ग्रामीण व्यवस्था ही पावसावर अवलंबून आहे हे पुस्तकी वाक्य प्रत्यक्षात अनुभवताना मला आठवतात ती पूरामुळे संपर्क तुटलेली गावे, खंडीत वीजपूरवठा आणि त्यामुळे बियाणे आहे तर खत नाही, दोन्ही असेल तर मजूर नाहीत आणि  सगळे सुरळीत झाले तर परतीच्या पावसाने उखडून टाकलेली पेरणी!! शहरांची तर बातच और!! वाढलेली कॉन्क्रिट-जंगले, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नसलेली पूरक सुविधा. अगदी अशी सुविधा असलीच तर त्यातले प्लॅस्टिक न काढल्यामुळे तुंबलेली. विस्कटलेली दळणवळणाची व्यवस्था, वीज-पाणी, भाजीपाला आदि अत्यावश्यक वस्तूंची आबाळ.....

आणि हे सगळे कमी म्हणून “पावसाचा आनंद साजरा करण्याचा” अट्टाहास! माळशेज घाट, लोणावळ्याचे भूशी धरण, खडकवासला, सिंहगड किंवा ड्यूकचा धबधबा – ही पुण्या-मुंबईच्या लोकांची आवडती पावसाळी डेस्टीनेशन्स!! तिथे उद्भवणारी धोकादायक आणि (बहुतेकवेळा) गलिच्छ परिस्थिती, पोलीस बंदोबस्तात रेन-डान्स आणि धबधब्यासारखी वाहणारी दारू- हाच का तो शहरी पावसाचा आनंद?

मुळात हे सगळे असे का?? आपण निसर्गाचा पराभव करून त्याला वश करू इच्छितो का? अगदी यंदाचा पावसाळा ही पुण्यात बिल्डींगची भिंत कोसळून पंधरा जणांना, मग मालाडमध्ये काही जणांना कवेत घेऊन निसर्गाने साजरा केलाच. मग तिवरे धरण फुटले, काल खारघरला बंधारा फुटला... आपल्याला आठवत असेल, दोन वर्षांपूर्वी पुणे नाशिक रोडवरून पहाटे जाणारी बस अचानक थांबली. ड्रायव्हरला तिथे एक गाव होते ते दिसेचना. मग कोसळणार्या पावसात शोधा-शोध केली तेंव्हा कळले की हे डोगराच्या कुशीत वसलेले गाव डोंगर कोसळून अख्खे वाहून गेले आहे!
मग चौकशी समिती नेमली जाते, एक-दोन अधिकारी निलंबीत होतात आणि चॅप्टर संपते. या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते की आपण निसर्गाला हरवण्यासाठी लढतो आहोत. पूर्वी पुणे-मुंबई प्रवासाला चार-पाच तास लागत. मग आपण सह्याद्रीला चार-पाच भोके पाडली आणि बोगद्याद्वारे एक्सप्रेस वे तयार केला आणि हे अंतर दोन तासांवर आणले. आता अजून सह्याद्री कुरतडायचा आणि हायपर-लूपने हे अंतर बारा-पंधरा मिनीटांवर आणायचे आहे!!

सरकार एका दिवशी हायवेच्या समृद्धी साठी जमिन संपादित करते आणि दुसर्या दिवशी तेहतीस कोटी झाडे लावण्याचा संकल्प करते. प्रत्येकाचे वेगवेगळे टारगेट्स असतात त्यांचा एकमेकांशी संबंध असण्याची गरजच नसते. असा ‘सबका विकास’ आपल्याला हवाय का??

पावसावर कविता करणारे कवी हा माझा लहानपणापासूनच कुतूहलाचा विषय आहे. पावसावर धो-धो कविता करणारी ही मंडळी माझ्या आवडत्या उन्हाळ्यावर मात्र ‘ग्रीष्म’ ‘पानझड’ असे त्रोटक शब्द वापरून आपली सूटका करून घेतात. याउलट कोकणचा मेवा, शाळेला सुट्टी, खेळायला मिळणारी (कवींच्या भाषेतील ‘रूक्ष’) मैदाने, सुट्टीतल्या पाहुणेमंडळीमुळे वाढलेली खेळ-भिडूंची संख्या इत्यादी गोष्टी उन्हाळ्यात पूरक असूनही कवी-मन पावसातच रमते.  ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हणतात. पावसात रवी-राज हे ढगांच्या आड लपलेले असल्यामुळे या कवीराज मंडळाचे फावते. तेच उन्हाळ्यात सगळा ताबा हा रवीचा असल्यामुळे कवींना फारसा वाव नसावा अशी माझी लहानपणापासूनच समजूत आहे.

असो.
मुळात पावसाळी कुंद कळ्यांचा गंध आपल्या आयुष्यात जरासा मंद असल्यामुळे कवीचा छंद लिहीण्याऐवजी लिहीला निबंध!

Friday, 8 February 2019

नावात काय आहे??

खरंतर, “नावात काय आहे?” – असे म्हणणार्या माणसालाही एक नाव होतेच की! पण विषय तो नाही. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारत देशात असंख्य पंथाची आणि प्रातांची एक “नाव-संस्कृती” आहे. बहुतांश माणसांना स्वतःचे नाव ठरवण्याचा आधिकार नसतो. जन्म देणारे जे ठरवतील ते नाव – ही आपली ढोबळ परंपरा.. तरीही या नाव ठेवण्याची (धारण करण्याची) एक विशिष्ठ पद्धत आहे. त्यात बर्यापैकी सुसूत्रता आहे. आई-वडील किंवा इतर संबंधीत नातेवाईक, आप्तांच्या मानसिकतेतून पुढील पीढीची नावे ठरतात. साधारणपणे घरच्या मोठ्या मुलाचे नाव आद्य-देवतेचे असावे या विचारातून ‘गणपती, गजानन, भालचंद्र’ वगैरे पासून सुरू असलेला प्रवास मग पुढे ‘ओंकार, विघ्नेश, शार्दूल’ असा सुरू रहात आजकाल ‘इभान, स्वोजस, परिन’ पर्यंत पोचलाय. पण शक्यतो ‘लंबोदर, एकदंत’ अशा नावाची माणसं समाजात फार कमी आढळतात किंबहुना नसतातच.

पण काही नावं लक्षवेधी असतात. सर्वसाधारणपणे आपल्या पाल्याचे नाव ‘वेगळे’ असावे यातून मग पुढे गमती-जमती होतंच असतात. काहीवेळा अशी नावे त्या नावाच्या ऐतिहासिक, पारंपारिक संदर्भाना छेद देतात आणि मग आपण असे नाव असलेली ती व्यक्ती आणि त्याचा पुरातन संदर्भ यांच्या गोंधळात हरवून जातो.

माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या एका मित्राने माझा असाच गोंधळ केला होता. हा मोठा अवलिया माणूस. पांढरे सोगा सोडलेले धोतर, ‘पान-तंबाखू खाणारा’ अशी ‘ठिबक-सिंचीत’ ओळख दाखवणारा पांढरा सदरा,  डोक्यावरची तिरकी टोपी, कपाळावर सकाळी बस्तीत जाऊन आल्याचा पुरावा देणारा गंधाचा लहानसा टीळा, पिळदार मिशा आणि पायातले भरपूर तेल प्यालेले कोल्हापूरी पायताण कर्-कर् वाजवत ‘नमस्कार ओ भाऊसाहेब’ अशी कानडी हेल असलेली सलामी देत स्वारी घरी यायची. विधात्याने जन्माला येतानाच एक डोळा कमी दिला असल्याने दुसर्या डोळ्याने संपूर्ण जग पहाण्यासाठी मान अशंतः वाकडी करायची सवय असावी. या माणसाचे नाव होते – “दुर्योधन”. गावात सगळेजण त्यांना दुर्योधन सावकार म्हणत. पीढीजात सावकारी असावी. “कारखान्यावर आलो हुतो, उस घातलाय यंदा, हिकडं. रत्नाप्पाआण्णा भेटले, आता जाताजाता तुमास्नी भेटून गावाकडं परत जायचं....” अशी सुरूवात करत वडिलांसोबत गावाकडच्या गप्पांची मैफिल रंगायची. या माणसाची पान खाण्याची पण एक विशिष्ठ पद्धत होती. आधी बटव्यातून दोन पानं काढायची, ती धोतराला पुसायची. मग त्याची देठं खुडायची आणि चुना लावून ती पानं तशीच तोंडात टाकायची.  मग चवीपूरता काथ नखाने खूडून तोंडात टाकायचा. आणि मग आडकित्याने सुपारी कुरतडत – गप्पांचा अड्डा मांडत – सुपारीचे बारीक तुकडे चघळायला तोंडात टाकायचे. “दोन एकर उस लावलोय यंदा. मळीत थोडं टामॅटो आणि मिरच्या लावलोय” किंवा “रत्नाप्पा आण्णाच्या कारखान्यातली पहिली उचल मिळायला अजून महिना लागंल त्याच्याआधी सा.रे. पाटील देईल बगा”. अश्या संवादातून मनात तयार झालेला ‘दुर्योधन’ पुढे हस्तिनापूरात पांडवांशी कट-कारस्थान करेल किंवा द्रौपदीचे वस्त्रहरण करेल हे त्यावेळी बाल-मनाला पटतच नसे. त्यातूनच दुर्योधन ‘स्वार्थी’ असेल पण ‘दुष्ट’ नसावा असे माझे मत झाले होते.

माझे आजोळ हे दत्तगुरूंचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. या दोन-अडीचशे उंबर्याच्या गावात बहुसंख्य कुटूंब ही या मंदिरात पुजा करणारे – पुजारी. त्यामुळे घरोघरी मुलांमध्ये “दत्तात्रेय, दिगंबर, श्रीपाद किंवा अनुसया” सापडणारच. मग या सगळ्या नावातून आपल्याला हवा आहे तो ‘दत्ता’ कसा शोधायचा? या प्रश्नाचा निकाल फार सुटसुटीतपणे या गावाने सोडवला होता. ज्याची मान थोडी जास्त उंच तो ‘दत्ता जिराफ’! कुणाला चिरमुर्याचे भडंग जास्त आवडते तो “दत्ता-भडंग”. सहा मुलींच्या पाठीवर झाला म्हणून कुणी ‘दिगू-सात”!! वगैरे, वगैरे. इथे ही नाव-संस्कृती इतकी खोलवर रूजली आहे की, बस स्टँड बर उतरल्यावर जर कुणाला सांगितले की, मला मोदक पुजारींच्या घरी जायचे आहे, तर कुणीही बरोब्बर घर दाखवतो. पुढच्या पिढीतील एखाद्याला त्याच्याविषयी विचारले तर तो, “मी दिगू सातचा मुलगा/नातू” असं सांगायला आजिबात संकोचत नाही.

असे बाळकडू मिळाले तर पुढे शाळा-कॉलेजात अस्मादिकांच्या कल्पकतेला उधाण आले नाही तरच नवल!!
पण खरी गम्मत आली ती जेंव्हा मोठ्या शहरात आणि मल्टिनॅशनल कंपनीत काम करताना. भारतातल्या निरनिराळ्या भागातून आलेली ही मंडळी आपल्या वेगवेगळ्या नावांसोबत तिथल्या “नाव ठेवण्याच्या” वेगवेगळ्या पद्धती घेऊन येतात. त्यातून काही भन्नाट प्रसंग घडतात.
आमच्या ऑफिसात एक गोरखपूर-नेपाळ सीमेलगतच्या उत्तर प्रदेशातला एक इंजिनियर नवीनच आला होता. त्याचे नाव पशुपतिसिंग. हा हरहुन्नरी माणूस लवकरच सगळ्या नव्या  वातावरणात रूळला. पण आठवडाभरात माझ्या लक्षात आले की याच्या नावाचे लघू-रूप प्रचलित झाले आहे.  सर्वजण त्याला “पशू” म्हणून हाक मारत असत. मी एक दोघांना सांगण्याचा प्रयत्न केला, “अरे, तो ‘पशू’ नाही, ‘पशूपति’ आहे!”. पण व्यर्थ.  शेवटी एकदा त्याच्यासकट सर्वांना बोलावून त्या विषयी चर्चा केली आणि त्याला “पी.पी.” हे सर्वमान्य संबोधन मिळाले.

उत्तर भारतात स्वतःच्याच (मोठ्या)नावाचे हे असे संक्षिप्त रूप चालू शकते. पण हाच माणूस महाराष्ट्रात आला की, गडबड होते. आमचे एक वरिष्ठ रमेशकुमार तिवारी (आर्.के.तिवारी) यांचा पासपोर्ट नव्याने मुंबईत बनवायचा होता. त्यानुसार त्यांनी आपल्या सेक्रेटरीला आवश्यक कागदपत्रे दिली आणि ऑफिसातल्या पासपोर्ट/व्हीसाची कामे करणार्या एजंटच्या मदतीने अर्ज तयार करायला सांगितले. आता ती सेक्रेटरी आणि एजंट दोघेही मराठी. त्यांनी अर्ज तयार केला आणि साहेबांकडे गेले. त्यानंतरचा संवाद पुढीलप्रमाणे:
तिवारीसाहेब: अरे, मेरा नाम गलत लिखा है!
एजंट: सर, दिखाइए| (बघून) सर, सही तो लिखा है|
साहेब: क्या लिखा है?
एजंट: रमेशकुमार किसनलाल तिवारी| सही है|
साहेब(सेक्रेटरीला): क्या है मेरा नाम? रमेशकुमार तिवारी? सही है ना?
सेक्रेटरी: येस् सर...
साहेब: तो यहां क्यू गलत लिखा है?
सेक्रेटरी: सर, सही तो लिखा है|
साहेब (वैतागून): अरे, मेरे भाई, मेरा नाम रमेशकुमार तिवारी है| मेरे पिता का नाम किसनलाल तिवारी है| हम दोनो अलग इन्सान है| .....
असे म्हणत अर्जामधील किसनलाल खोडून काढले आणि त्या दोघांना ‘जा अर्ज पुन्हा भरून आणा’ असा दम भरून पिटाळून लावले. दोघेही आपले काहीही चुकलेले नाही या ठाम समजूतीत बाहेर आले. ‘बॉस कुछभी बात करता है, हमको सताने के लिए फिरसे फॉर्म भरनेको बोला है’ .. वगैरे चीडचीड शांत झाल्यावर त्यांना ‘उत्तरेत आपल्या नावात वडीलांचे नाव लावत नाहीत, उदा. एल्.के. आडवाणी हे लालकृष्ण आडवाणी आहेत. लालकृष्ण हे त्यांचेच नाव आहे. कृष्ण हे त्यांचे वडील नव्हेत!’ हा नावातील सांस्कृतिक फरक समजावून सांगितला आणि अखेर तिवारीसाहेबांना पासपोर्ट मिळालायचा मार्ग मोकळा झाला.
अजूनही काहीवेळेला सीके म्हणजे चंद्रकांत, जेपी म्हणजे जयप्रकाश, एन्एल् म्हणजे नंदलाल अशी नावे असलेली माणसे भेटली की अशा लोकांचा पासपोर्ट तपासून पहावा असे वाटते.

उत्तरेपेक्षा दक्षिणेची तर्हा निराळी आहे. इथे गावाचे नाव, कुटूंबाचे नाव, वडिलांचे नाव आणि स्वतःचे नाव असा प्रवास आहे. अर्थात ही काही सरसकट पद्धत नाही. कर्नाटकातल्या काही भागात महाराष्ट्राच्या नाव पद्धतीप्रमाणेच नाव, वडीलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशी पद्धत आहे. पण दक्षिण कर्नाटकात हे उलट झालेले पहायला मिळते. उदा. माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी. यातील “एच्” हे त्यांच्या गावाचे नाव दर्शवते.
तामिळनाडूत बहुतेक लोक वडिलांच्या नावाचे संक्षिप्त रूप स्वतःच्या नावाआधी लावतात. एस्. संजय, के. श्रीकांत वगैरे. माझा एक तमिळ मित्र स्वतःचे नाव पीए. रामदास असे लावतो. मी त्याला हटकले तेंव्हा खरा प्रकार समजला की ‘पीए” हे दोन स्वतंत्र शब्द नसुन तमिळ मधल्या ‘पळणीस्वामी’ या एकाच शब्दाचे लघूरूप आहे. लहानपणी शाळेत नाव लिहीताना तमिळ ‘प’ हे मुळाक्षर इंग्रजीतले ‘पीए’ झाले आणि त्याचा ‘पीए रामदास’ झाला. दिल्लीत बॅन्केत खाते उघडताना या वाढीव ‘ए’ ने त्याला इतका त्रास दिला की शेवटी त्या बॅन्केच्या कोईमतुर शाखेच्या व्यवस्थापकाशी त्याने दिल्लीतल्या व्यवस्थापकाचा संवाद घडवला तेंव्हा कुठे मामला मिटला.

भारतातच नावाविषयीचे असे नानाविध किस्से मिळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लोक जेंव्हा भारतात येतात तेंव्हा नावांची ही मजा ग्लोबल होते.
जपानी लोकांचे आदरार्थी संबोधन म्हणून ते नावाच्या मागे ‘सान’ लावतात. आमच्या जपानी वर्गात एक ओक नावाच्या मॅडम होत्या. त्यांना ‘ओकसान्’ म्हणताना तो जपानी शिक्षक इतका लाजला. खोलात गेल्यावर समजले ‘ओकसान्’ म्हणजे जपानीत ‘माझी प्रिय बायको’.
लहानपणी रामरक्षा रोज म्हटल्यामुळे जे फळ मिळत असे तसेच ग्लोबल फळ आता मॅडरिन किंवा चिनी लोकांची नावे ‘बिनचूक’ उच्चारल्यावर मिळते म्हणे! उदाहरणादाखल अगदी सोपे नाव घेऊ- SongYang! आता या भाषेत “g” म्हणायचा नसतो (silent). म्हणून या माणसाचे नाव “सुंयां” असे असते.
व्यक्ती भारतातील असो वा परदेशातील, प्रत्येकाला आपले नाव लोकांनी अचुकपणे उच्चारावे असे वाटणे स्वाभाविक आहे.  प्रसिद्ध management गुरू Dale Carnegie म्हणतो तसे “व्यक्तीचे नाव हा त्या व्यक्तीसाठी जगातला सर्वात सुंदर ध्वनी असतो”. त्याचा आदर राखलाच पाहिजे आणि प्रत्येक नावाचे संबोधन हे त्या नामधारीला जसे हवे तसेच झाले पाहीजे.....
कारण... जे काही आहे ते सर्व नावातंच आहे!

(विशेष सुचना: या लेखातील नावे ही सांकेतिक आहेत. जर या नावांमध्ये आणि नाव-गुणधर्मामध्ये कुणाशी साम्य आढळले तर लेख योग्य ठिकाणी पोहोचला, असे समजुया!).