Thursday, 17 June 2021

राफ्टींग बोट

 गुरगांवला नवीन कंपनीत आलो आणि पहिलेच काम मिळाले ते मुंबई आणि महाराष्ट्रातील टेलिकॉम नेटवर्क उभारणीच्या प्रोजेक्ट मध्ये. टेलिकॉम मध्ये मुंबई (महानगर) स्वतंत्र आणि उर्वरित महाराष्ट्रासह गोवा असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. मी येण्याच्या काही दिवस आधी मुंबई महानगराचे काम सुरु झाले होते. उर्वरित महाराष्ट्रासह गोव्यासाठी अजून परवानगी यायची होती. याआधी महाराष्ट्रात काम केल्यामुळे आणि राज्य ‘आपलेच’ असल्याने नेटवर्क उभारणीच्या प्रोजेक्ट मध्ये काम करणे हे अवघड नव्हते. 

बजेट कमी करत फक्त थोडेसे टॉवर उभे करून नाममात्र नेटवर्क सुरू करा अशी परवानगी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानुसार काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नेटवर्क उभे करावे असे ठरले. मग पुणे आणि गोवा इथे प्राधान्याने आणि उरलेले टॉवर्स इतर ठिकाणी अशी एक सर्वसाधारण  योजना बनवली गेली.. त्यानुसार उरलेले टॉवर्स तिसऱ्या मोठ्या शहरात म्हणजे नागपुरात लावावे असे प्रोजेक्ट टीमने ठरवले आणि माझ्याकडे ऑर्डर साठी फाईल पाठवली. मला नागपूर ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर कव्हरेज द्यावे असे वाटत होते. ते पुणे-नागपूर जोडण्यापेक्षा स्वस्त आणि बिझनेस साठी फायदेशीर होते. पण मी अगदीच नवीन असल्याने माझे कोण ऐकणार ह्या पार्श्वभूमीवर मी माझे मत माझ्या बॉसकडे मांडले. त्यांना ते समजले आणि त्यांनी मला पश्चिम विभागीय बिझनेस हेड ना भेटायला सांगितले. मी ओळखत नव्हतो. त्यावर ‘तुम एक बार मिल लो, अपने आप दोस्ती हो जाएगी' असा दिलासा मिळाला. मग विभागीय बिझनेस हैड साहेबांची वेळ मागितली. भेटायला गेलो..मुळचा पंजाबी माणूस, जयपूरला स्थायिक आणि मुंबईत खूप वर्षे काम केल्यामुळे खडानखडा माहिती...

“आओ, मराठी माणूस!! कसा काय? बरा हाय ना?” अशी अर्धवट मराठीत सुरुवात करून मला हलकं केलं. माझा मुद्दा समजून घेतला. तो त्यांना पटलाही. लगेच इंजिनिअरिंगच्या मंडळींना बोलावून त्यांना नेटवर्क मध्ये ‘तसे’ बदल करायला लावले आणि माझी त्या कोअर टीममधली जागा मजबूत झाली.

नंतर भेटी होत राहिल्या. हळूहळू प्रोजेक्ट पुढे सरकत होता. ठरलेल्या वेळी मुंबईत सर्व्हिस सुरू झाली. शंकर-एहसान-लॉय ने संगीतबद्ध केलेल्या सिग्नेचर ट्यूनला चांगला प्रतिसाद मिळत होता. मुंबईत प्रतिसाद छान होता…पण काहीतरी कमी होते..

पूर्वीपासून मुंबईत सेवा देणाऱ्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी काहीतरी ‘वेगळे’ करायची गरज होती.

एक दिवस मला मिटींगमध्ये बोलावले आणि विचारले, “ मुंबई की बारिश में सबसे पहले कौनसा ट्रॅफिक बंद होता है?”.. मी म्हणालो, “ मिलन सबवे और हिंदमाता!”..

ते खूष झाले आणि मला म्हणाले अब आगे देखो.. मी प्रेझेंटेशन ऐकत गेलो. ब्रॅंड टीम, एजन्सी आणि सगळ्याच मुंबईच्या सहकारी मंडळींनी कमाल केली होती. ही योजना खरंच थक्क करणारी होती.

मुंबईत मिलन सबवेच्या बाहेरचे एक मोठे होर्डींग्ज भाड्याने घेतले होते. त्यावर एक राफ्टींगची बोट बांधण्यात आली होती. कंपनीचे ब्रॅन्डींग करून त्या होर्डिंग्ज वर लिहिले होते – “आपत्कालीन परिस्थितीत हे दोर कापा आणि ही बोट वापरा”…

ही कल्पना चांगलीच गाजली. एक-दोन‌वेळा ‘ते’ दोर कापलेसुद्धा गेले!! सगळीकडे गवगवा झाला होता. महानगरपालिका, मिडीया या सगळ्यांनी दखल घेतली. या वेगळ्या कल्पनेचे मुंबईकरांनाही कौतुक केले.

ब्रॅंड ची ओळख वाढली!!

दरवर्षी पाऊस पडला की मुंबई तुंबते. मिलन सबवे, हिंदमाता सर्कलमध्ये पाणी साचते. आणि आमच्या ‘बोटीची’ आठवण येते!!


भूज ची कथा

 २६ जानेवारी २००१... नव्या ऑफीसात रुजू होऊन सात-आठ महिने झाले होते. हळूहळू टेलिकॉम, पुणे या सगळ्यात रुळत होतो.

राष्ट्रीय सुट्टी असल्यामुळे ऑफीसने एका ट्रीपचे आयोजन केले होते. खडकवासल्याच्या पाठीमागे कुठेतरी रिसॉर्ट होते, तिथे जाऊन दिवस घालावायचा होता. मला त्यादिवशी संध्याकाळी काहीतरी काम असल्यामुळे मी गेलो नव्हतो. बाकी डिपार्टमेंटमधले सगळे सहकारी गेले होते. 

बॅचलर असल्यामुळे, आता संध्याकाळपर्यंत वेळ घालवण्यासाठी उपाय म्हणून आणि रेंगाळलेली काही किरकोळ कामं संपवावीत म्हणून दहा साडेदहाच्या सुमारास ऑफीसात गेलो.  घर जवळच असल्याने जर जेवण झाल्यावर डुलकी काढावी वाटली तर परत घरी जायचे असा बेत होता. 

आज बरीच मंडळी सहलीला गेली असल्यामुळे सुट्टी दिवशी दिसणारी तुरळक हालचालही आज मंद होती. मी टेबलवर रचून ठेवलेली कागदपत्रे फाईल करून डेस्क स्वच्छ करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात आमच्या सीईओ साहेबांचा शिपाई माझ्याकडे आला आणि म्हणाला, “साहेबांनी बोलावले आहे”.

“मला??” मी चमकून प्रतिप्रश्न केला. वास्तविक गेल्या सात-आठ महिन्यांत त्यांच्याशी संपर्क करण्याची वेळच आली नव्हती. तसेही इतक्या मोठ्या माणसाला मला भेटण्याचे काही कारण नव्हते. माझे जेष्ठ सहकारी आणि डिपार्टमेंट चे मुख्यधिकारी त्यांना नियमित भेटत असत आणि त्यांच्या सुचनेनुसार आम्ही काम करत असू. त्यामुळे मला असे अचानक सीईओ साहेबांनी बोलावणे थोडे आश्चर्यकारक होते. मी त्या शिपायाला पुन्हा विचारले, “खरंच साहेब मला बोलवत आहेत का?? अरे, ते मला ओळखत नाहीत, त्यांना माझे नावही माहीत नसेल कदाचित!! आम्ही कधी समोरासमोर भेटलेलोच नाही, आजपर्यंत!!” मी आपला मला जमेल तेवढा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

त्यावर तो म्हणाला, “जे कुणी परचेस डिपार्टमेंटमध्ये असेल त्यांना बोलावले आहे..आणि आत्ता तू एकटाच आहेस. म्हणून तू चल.”.

हे खरे होते. त्याक्षणी मी डिपार्टमेंटमध्ये एकटाच होतो. बाकीचे सगळे सहलीला गेले होते. मी डायरी घेतली. सुट्टी असल्यामुळे मी नेमका जीन्स आणि टी-शर्ट घालून ऑफीसात गेलो होतो, पायात चप्पल होती, शूज नव्हते.. स्वतःच्या या ओंगळपणाला मनातल्या मनात शिव्या देत, सीईओ साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. साहेब गडबडीत असावेत. त्यांनी माझे नाव विचारले आणि अत्यंत मृदू स्वरात मला म्हणाले, “मंदार, मला क्षमा कर. आज सुट्टीच्या दिवशी तुझी मदत हवी आहे”.

“येस सर….” मी.

“आपल्याला डीझेल जनरेटर (डीजी) च्या सप्लायर्सशी संपर्क करायचा आहे. आणि त्यांना ट्रकवरती डीजी ठेवून तो वापरता येईल असे काही ट्रक्स आपल्याला गुजरात मध्ये पाठवायचे आहेत. थोडंसं अर्जंट काम आहे आणि मी पुढचा एक-दीड तास ऑफीसात आहे. तोवर काय उपलब्ध होईल तसे मला कळव.”

“ओके” असे म्हणून मी केबिनच्या बाहेर पडलो. पहिल्यांदा घाम पुसला आणि मग विचार करायला सुरुवात केली….तसा डीजीचा आणि माझा काहीच संबंध नव्हता. ‘डीजी’ हे प्रकरण माझा एक दुसरा सहकारी हाताळत होता. त्यामुळे मला डीजी, त्यांचे सप्लायर्स वगैरे माहिती  असण्याची सुतराम शक्यता नव्हती.

‘आता काय करावे?’ हा विचार करत करत परत माझ्या जागेवर आलो. त्या सहकार्याला फोन लावला….बंद!! नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर!!!

मग डिपार्टमेंटच्या साहेबांना फोन‌ लावला – तो ही बंद!!

मग एक-एक करून परचेसच्या सगळ्या सहकारी मित्रांना फोन लावले…तेही सगळे ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर' होते. इतर डिपार्टमेंट मधील काही मंडळींना फोन लावण्याच्या प्रयत्नालाही उत्तर ‘तेच’ होते. ते सगळे एकाच ठिकाणी सहलीसाठी गेलेले असल्याने कुणा एकाचा जरी फोन लागला तर मला माझ्या सहकाऱ्यांपर्यंत पोचता येईल ही आशा धूसर होत होती. एकंदरीत डीजी सप्लाय हाताळणारा माझा सहकारी किंवा सिनिअर्स यांना संपर्क होण्याची शक्यता अजिबात नव्हती. 

मग मी माझ्या इलेक्ट्रॉनिक सप्लायर्सशी संपर्क करून त्यांच्याकडून काही डीजी सप्लायर्स सापडतात का याची चाचपणी केली…यातही यश आले नाही.

टेन्शन वाढत होतं. जी माहिती हवी होती त्याच्या जवळपास जाण्याचा मार्गही दिसत नव्हता. ‘ऑफीसमधून पळून जाऊ' असा विचार आला..पण उद्या सकाळी साहेबांना कसे तोंड दाखवणार? ह्या काळजीने तो बेत ही रद्द केला! 

पहिल्यांदाच सीईओना भेटलो. त्यांनी काम दिले. आणि दीड तासांनी परत बोलावले आहे तेंव्हा काय उत्तर देणार? या भीतीने घशाला कोरड पडली. पाणी प्यायला म्हणून कॅन्टीन मध्ये गेलो. आणि माझ्या सुदैवाने तिथे एक साईट मेंटेनन्स इंजिनिअर चहा पीत बसला होता. त्याला पकडले. परिस्थिती सांगितली. त्याच्याकडे साईटवरील डीजी दुरुस्ती करणार्या इंजिनिअरचा नंबर होता. त्याला फोन‌ लावला आणि त्याच्या सीईओ साहेबांचा नंबर मागितला. तो त्याच्याकडे नव्हता. मग त्याने ज्याचा नंबर दिला त्या व्यक्तीला फोन लावला..असे करत करत डीजी कंपनीच्या सेल्स मॅनेजर पर्यंत पोचलो.

सुदैवाने तो सेल्स मॅनेजर आमच्या ऑफीसमध्ये माझ्या सहकाऱ्याला नेहमी भेटायला येत असल्याने त्यांची तोंडओळख होती. जीवात जीव आला. त्याला परिस्थिती सांगितली. त्यालाही सुट्टी असल्यामुळे त्याने थोडा वेळ मागितला. 

थोड्या वेळाने त्याने फोन करून मला सांगितले की असे डीजी ठेवलेले दोन ट्रक्स आपण वापरू शकता. ते एका तासाभरात गुजरातला पाठवण्याची व्यवस्था होईल. सोबत त्याने हेसुद्धा सांगितले की आमच्या आणि त्यांच्या सीईओंचे याबाबत बोलणे झाले आहे. मला इतकी माहिती पुरेशी होती.

हा सगळा प्रकार गुंडाळण्यात दोनेक तास कसे गेले हे कळलेच नव्हते. मी धावतच सीईओ साहेबांकडे गेलो. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला. त्यांचे सप्लायरशी बोलणे झाले असल्याचे सांगितले. आणि आता पुढील तासाभरात जे ट्रक्स गुजरातला जायला निघतील त्याची माहिती गुजरातच्या ऑफीसात कळवायला सांगितली. त्यांचे ‘धन्यवाद’ घेऊन केबिनच्या बाहेर पडलो. जेवलो. झोप उडाली होतीच. त्यामुळे सकाळी योजलेले आणि न झालेले काम उरकले. ट्रक्सची माहिती गुजरातच्या सहकार्याला मेसेजवरच सांगितली आणि त्याचा नंबर डीजी कंपनीच्या सेल्स मॅनेजरला दिला आणि ऑफीसमधून बाहेर पडलो. 

एका मित्राकडे गेलो..आणि मग समजले….

गुजरातच्या भूज भागात सकाळी मोठा भूकंप झाला आहे!!

मग लिंक लागली!! गुजरातच्या सहकार्याला फोन लावला. तोही धावपळीतच होता. त्याच्याकडून आपले कर्मचारी आणि कुटूंबीय सुरक्षित असल्याची माहिती घेतली. त्याला डीजीच्या ट्रक्सची माहिती दिली. तेंव्हा तो म्हणाला तिथे वीज नाही. त्यामुळे नेटवर्क चालू ठेवायचं असेल तर डीजी लागेल. तो कुठे ठेवायचा ह्याची जागा नक्की नसल्याने तो ट्रकवर ठेवायचा आणि त्या ट्रकला आपल्याला नेटवर्क हवे असलेल्या जागी उभा करायचा आणि वीज देऊन नेटवर्क सुरू करायचे अशी योजना होती. गेल्या दोन-तीन तासात नकळत माझ्याकडून काय काम झालंय यांचा अंदाज आला.किल्लारीची आठवण होतीच. त्यामुळे सहकारी मित्राला अजून काही हवे असेल तर फोन कर असे सांगितले….रात्री उशीरा डिपार्टमेंटच्या साहेबांना ‘दुपारचे सीईओ प्रकरण’ सांगितले.

तो दिवस सरला. दुसऱ्या दिवशी ऑफीसात साहेबांनी सकाळीच बोलावले आणि मला आणि सहकारी मंडळींना डीजीसोबत इलेक्ट्रॉनिक उपकरणे पण ट्रकवर बसवता येईल का याची चाचपणी करायला सांगितले. एका ट्रकवर एका मोबाईल टॉवरचे सगळे पार्ट्स बसवून साईट चालू करायची ही भन्नाट आयडिया होती. नंतर रुळलेल्या Cellular on Wheels (CoW) ची ती पहिली पायरी असावी.

गुजरातचे युद्ध आम्ही जिंकलो होतो. ट्रक वेळेवर पोचले होते. भूज भागात सेल्युलर नेटवर्क पुन्हा प्रस्थापित करणारी आमची एकमेव कंपनी होती. अर्थात आमच्या गुजराती सहकार्यांनी जीवाचे रान‌ केले‌ होते.

संकट पार पडले. नंतर युद्धवीरांच्या कौतुकाचा सोहळा होता. आमच्या टीममधील आमचे गुजरातचे सहकारी आणि पुण्याहून डीजी सप्लायरशी संबंधित सहकारी यांचे कौतुक होणारच होते. त्या यादीत शेवटचे नाव ‘मंदार कुलकर्णी’ असणे हा माझ्यासाठी सुखद धक्का होता…हे टेलिकॉम प्रवासातील माझे ‘पहिलेच प्रशस्तीपत्र’ होते. म्हणून ते आजही लक्षात आहे.

****”**


Wednesday, 2 June 2021

रिमोट कंट्रोल

 नोकरीला लागून एखादाच महिना झाला होता. हळूहळू कंपनीत रुळायला लागलो होतो. सहकारी मित्रांच्या आणि मॅनेजर साहेबांच्या मदतीने टीव्ही साठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सामान, त्याचे सप्लायर्स वगैरे अभ्यास सुरू होता. कंपनीतील अंतर्गत पद्धती आणि माणसे यांची ओळख व्हावी म्हणून आमचे मॅनेजर मला अधूनमधून मिटींग्सला नेत असत. आमच्या परचेस टीमसाठी सकाळी नऊ वाजताची ‘प्रॉडक्शन मिटींग’ फार महत्त्वाची असायची. त्यादिवशी आणि पुढच्या काही दिवसांत कुठल्या सामानामुळे उत्पादन बंद पडू शकते आणि ते आणण्यासाठी काय प्रयत्न करायचे याची जोरदार वादळी चर्चा होत असे. कधी कधी आमचे काही सहकारी मिटींगमधून तसेच सप्लायरच्या फॅक्टरीत जात आणि लागणार्या सामानाची तजवीज करत. त्या मिटींगमधून माझ्या सहकाऱ्यांना सप्लायरच्या फॅक्टरीच्या ठिकाणी प्रवास करण्याचा आणि सामान वेळेवर पोहचवण्याचा आदेश निघत असे.. त्यामुळे सकाळी चहाला भेटलेले सहकारी दुपारच्या जेवणापर्यंत जवळच्या वाळूज एमआयडीसी पासून ते पुणे, मुंबई, बेंगलोर अशा कुठल्या तरी वाटेला लागलेले असायचे.

माझ्यासारख्या नवख्या इंजिनिअर साठी हा करमणूक प्रधान शिक्षणाचा खजिना होता. एकदा एका मिटींग मध्ये टीव्हीच्या रिमोट कंट्रोलच्या बॅटरी (सेल) कमी आहेत त्या लवकर आणा असा आदेश निघाला. खरंतर, टीव्हीचे प्रॉडक्शन त्यामुळे थांबणार नव्हते. टीव्हीसोबत खोक्यामध्ये एक प्लास्टिक पिशवी असायची. त्यात वापरण्याच्या सुचना (User Manual), वारंटी-कार्ड, रिमोट कंट्रोल आणि त्यासाठी लागणारे दोन बॅटरी सेल्स असायचे. ठरवलेल्या प्रॉडक्शन साठी बॅटरी सेल थोडे कमी पडत होते..ते दुपारपर्यंत येतील अशी माझ्या सहकाऱ्याने माहिती दिली. प्रत्यक्षात त्या ‘दुपारला’ थोडा उशीर झाला.

आम्ही दुपारचा चहा घेऊन घरी निघण्यापूर्वी एकदा राहिलेल्या कामांवर नजर टाकत होतो. तोवर प्रॉडक्शन इंजिनिअर धावत धावत आमच्या डिपार्टमेंटमध्ये आला आणि सेल विषयी विचारु लागला. त्यावेळी कंपनीत फोनही नव्हते. माझ्या सहकाऱ्याने ‘येतील रे’ असे सांगत त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते दोघे जिथे प्रॉडक्शन होते त्या इमारतीत गेले. मी रिकामा होतो, म्हणून मीही गेलो. पहातो तर काय??

टीव्हीची उघडी खोकी सगळ्या इमारतीत पसरून ठेवली होती. त्यात टीव्ही होता. प्लास्टिक पिशवी नव्हती. जिथे ती पिशवी भरली जायची तिथे पिशव्यांचा ढीग होता. त्यामध्ये दोन सेल सोडून सगळे भरलेले होते. आता सेल आले की ते भरायचे आणि खोक्यात पिशवी ठेवून खोटे बंद करून गोडावून मध्ये पाठवायचे इतकेच काम बाकी होते. पण त्यामुळे शॉप फ्लोअर च्या इमारतीत जिकडे पहावे तिकडे टीव्हीची अर्धवट भरलेली-उघडी खोकी पडली होती. ती बंद केली नसल्याने एकमेकांवर ठेवता येत नव्हती.

टीव्हीच्या प्रॉडक्शन मध्ये रिमोट साठी लागणारा छोटासा सेल इतकी भयावह स्थिती करू शकतो हे आम्हा सगळ्यांनाच नवीन होतं. 

रामाचा सेतू बांधताना खारीचा वाटा काय असतो ते प्रत्यक्ष जाणवलं होतं. आपल्याकडे कुठल्याही समारंभाची सुरुवात करताना दीप-प्रज्वलन करतात. तिथे मान्यवर पाहुण्यांना स्टेजवर त्यासाठी काड्यांची पेटी असावी लागते हे कॉलेजच्या एका समारंभात शिकलो होतो!!  इथे टीव्ही प्रॉडक्शनच्या पसायदानात ‘बॅटरी-सेल’ नव्हते!!

सामान छोटे असो वा मोठे ते वेळेवर पोहोचले नाही तर मोठी अडचण निर्माण करू शकते हे करिअरच्या फार लवकर समजले, हे एका दृष्टीने बरेच झाले म्हणायचे!!!

सुदैवाने ती बॅटरी सेल घेऊन येणारी गाडी फॅक्टरीत पोचली. ते सेल तपासून प्रॉडक्शन साठी देता देता शिफ्ट संपायची वेळ झाली. आमच्यामुळे प्रॉडक्शन इंजिनिअरला आता ओव्हर टाईम करून त्या सेलसकट टीव्हीची खोकी बंद करून गोडावून मध्ये पाठवायची होती. त्याला त्याच्या या कामासाठी शुभेच्छा देऊन आम्ही सटकलो आणि चुपचाप घरी जाणार्या बस मध्ये जाऊन बसलो!!!

****