Saturday, 29 November 2025

दिल्लीकर व्हावे का??.... का व्हावे??


२००८ चा हिवाळा. कडाक्याची थंडी आणि सोबतीला घनदाट धुकं. हायवेवरून गाडी चालवताना गाडीत जे काही लाईट्स, इंडिकेटर्स उपलब्ध आहेत ते सगळे सुरु ठेवायचे. गाडीतला हिटरआयुष्यात पहिल्यांदाच वापरलेला. इकडे घरी सोलापूरी पुलगमच्या चादरी बिनकामाच्या ठरल्या. नुसतेच स्वेटर्स पुरेसे पडत नव्हते महाराष्ट्रातून पहिल्यांदाच दीर्घ काळ रहाण्यासाठी बाहेर पडलेल्या माझा आणि माझ्या कुटुंबियांचा हा दिल्ली/गुरगावचा पहिला अनुभव!!!

सुरुवातीला एकदा ऑफीसमध्ये मला एसीचा त्रास होतो आहे अशी तक्रार केली. तेंव्हा सुटाबुटातील एक व्यक्ती माझ्या केबिन मध्ये आली. मी त्यांना माझ्या अंगावर डक्टमधून थंड हवा येते आहे, हे सांगितले. थोड्या वेळाने तीच व्यक्ती शिडी घेऊन आली. सरसर वर चढून डक्टची दिशा बदलून निघून गेली. डक्ट ठीक करणारा माणूस सुटाबुटात आणि केबिनमधे बसणारा मी स्वेटर् घालून!! हा माझ्यासाठी धक्का होता. ‘हे मराठी माणसा, दिल्लीत रहायचे असेल तर टेचातरहायचे. इथे गावंढळ रहायचे नाही’ – हा सुरुवातीच्या दिवसातला दिल्लीचा आणखी एक अनुभव!!

आमच्या एका सहकार्याच्या वडिलांचे निधन झाले. आम्ही सगळे अंत्यसंस्काराला पंजाबीबागला गेलो. आणि तिथे माझ्या लक्षात आले की इतक्या सगळ्या माणसांत मी एकटाच जीन्स आणि टीशर्ट घालून आलोय. बाकी सगळे पांढराशुभ्र कुर्ता-पायजमा घालून आले आहेत. मी युनिफॉर्ममध्ये नाही त्यामुळे मी आत जाऊ शकतो का? – याची खातरजमा करून मगच मी अंत्यदर्शन घेतले.

दिल्लीकर होण्याचे सुरुवातीचे असे काही धक्के सोडले तर बाकी हा एक सुखद अनुभव आहे. (इथे दिल्लीकर असे मी म्हणतो तेंव्हा दिल्ली, नॉयडा, गुरगावफरीदाबाद वगैरे संपूर्ण दिल्ली परिसर अभिप्रेत आहे. कारण अस्सल दिल्लीकरांची गुरगावफरीदाबाद वगैरे भागाबद्दल वेगळी मतं आहेतत्यावर नंतर कधीतरी लिहूया).

माझ्यामते मराठी दिल्लीकर तीन प्रकारचे आहेत.

पहिला दोन-तीन पिढ्यांपासून हा मराठी माणूस दिल्लीत रहातो. याची मूळ भाषा मराठी तरी हा दिल्लीचा दिलवाला आहे.

दुसरा - नोकरी-धंद्याच्या निमित्ताने ही मंडळी दिल्लीत आली आणि पंचवीस तीस वर्षे दिल्लीत राहून दिल्लीकर झाली. यात सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने आहेत.

तिसरा फक्त दोन-तीन वर्ष इथे थांबून मी परत महाराष्ट्रात जाईन. किंवा दोन वर्षांनी बेंगलोरला जाईनअमेरिकेला, सिंगापूरला जाईन. यातली काही माणसं कुटुंबासह येतात तर काही एकटीच.

या सगळ्यांमध्ये एक समान धागा असतो तो मराठीचा मराठी संस्कृतीचा. मग फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर इंदौरभोपाळग्वाल्हेर चे बडोद्याचे, बेळगावचे मराठी भाषिक यात समाविष्ट होतात. आणि मग,  ‘गुढीपाडव्याची शोभायात्रा कुठे आहे?” “विजयादशमीला सीमोल्लंघन सोहळा कुठे आहे?” “सत्यनारायणाच्या पुजेसाठी गुरूजी कुठे मिळतील?” याचा शोध सुरु होतो. आणि गरज ही शोधाची जननी आहेया उक्तीनुसार मग काही उत्साही मंडळी एकत्र येतात..तिथूनच मग गणेशोत्सवाची सुरुवात होते. कोजागिरी पौर्णिमा, चैत्रातील हळदी कुंकू इत्यादी कार्यक्रम सुरु होतात. दिल्ली आणि परिसरात हे सगळे उत्साहात पार पडते. यात भर म्हणून दिवाळी-पहाटआषाढी एकादशीनिमित्त सांकेतिक वारी आदी कार्यक्रम  दिल्लीकर मराठी माणसांना एकत्र आणण्यात मोलाची भर टाकतात. या सगळ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी आणि तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक जबाबदारी इथला मराठी माणूस आपल्या दैनंदिन  नोकरी-धंद्यातील काळवेळ सांभाळून व्यवस्थित पार पाडतो.

अलिकडे यात अजून एक मराठी प्रकार वाढला आहे. जो उत्तर भारतीय आपल्या कामानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक किंवा महाराष्ट्रातील कुठल्याशा जिल्ह्य़ात दहा-पंधरा वर्ष वास्तव्य करतो आणि नंतर परत उत्तर भारतात येतो, तोही दिल्लीकर मराठी म्हणून सहज मिसळून जातो. गणेशोत्सवासारख्या उत्सवात यांचा सहभाग लक्षणीय असतो. कधीकधी धेडगुजरी वाटलं तरी या मंडळींचे मराठी संस्कृतीवर प्रेम असते. माझ्या एका पंजाबी मित्राने आपल्या मुलीचे नाव आत्याठेवले आहे. त्याचे स्पष्टीकरण देताना तो सांगतो, “मुंबईमें हमारे सामने एक मराठी फॅमिली रहती थी. उनकी छोटी बेटी आत्या-आत्याकरती थी. हमे अच्छा लगा और हमने हमारी बेटी का नाम आद्याके बदले आत्यारख दिया!!”

महाराष्ट्रातून आणि इतर भागातून दिल्लीत येणारी मराठी माणसे आपापल्या परंपरा घेऊन येतात आणि इथले मराठीपणविस्तीर्ण होत जाते. इथे कोकणातला, दक्षिण महाराष्ट्रातला किंवा बेळगावचा दडपे पोहेआवडणारा मराठी माणूस नागपूरच्या तर्री पोह्यांचाचाहता होतो. “सावजीचा चाहता तांबड्या-पांढर्याचा भक्त होतो. अळूच्या पानांच्या वड्या किंवा अळूचे फतफते खाणारा आता अळूच्या मूळाची अरवीची भाजी खाऊ लागतो. निरनिराळ्या मराठी रुढी, मराठी शब्दभांडार इथे सहज उपलब्ध होऊन जाते.

गणपती उत्सवाच्या काळात महालक्ष्मीचीपुजा का करतात? हा माझा प्रश्न होता. आम्हा कोल्हापूरकरांना महालक्ष्मीम्हणजे कोल्हापूरची अंबाबाई इतकंच ठाऊक आहे. कोल्हापूरात गणेशोत्सवात अंबाबाईची विशेष पुजा झाल्याचे इतक्या वर्षात ऐकलं किंवा पाहिलं नाही.. मग ही काय भानगड आहे हे मी आईला विचारले. ती म्हणाली, “महालक्ष्मी म्हणजेच  गौरी!! काही भागात त्याला महालक्ष्मी म्हणतात.” आता त्या जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोघी असतात म्हणून त्या महालक्ष्म्याहोतात. तेंव्हापासून मीपण एकवचन म्हणजे कोल्हापूरआणि अनेकवचन म्हणजे गणेशोत्सवहे पक्कं लक्षात ठेवलं आहे.

एकदा कुठल्यातरी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत सगळ्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती. कुणी स्टेजच्या मागचे बॅनर लावत होता, कुणी लाईट्स, कुणी ध्वनीव्यवस्था पहात होता. त्यात एक उत्साही कार्यकर्ता मारतुलशोधत होता. त्याने तिथे असलेल्या वीस-पंचवीस जणांना विचारले, “दादा, मारतुल आहे?” प्रत्येकाने हे असले कायमाझ्याकडे नाही हे ठणकावून सांगितले.  मग तो माझ्याकडे आला आणि तोच प्रश्न- “दादा, मारतुल आहे?” मी उडालोच! म्हटलं, “भावा, कोल्लापूर काय??” त्याला सांगितले मारतुलम्हणण्या ऐवजी स्क्रू ड्रायवरमाग, कुणीही देईल!! आणि त्याला जो स्क्रू टाईट करायचा होता तो बिनदिक्कत झाला!!

दिल्लीत मराठी म्हणून रहाण्याचे अनेक फायदे आहेत. इथले मराठी उत्सव अजून (महाराष्ट्राइतके) भव्य आणि कमर्शियल झालेले नाहीतत्यामुळे इथे प्रत्येक लहान-मोठ्या उत्साही कार्यकर्त्याला आपली आवड जपण्याची आणि वाढवण्याची संधी मिळते. हौशी गायक, वादक, चित्रकार अगदी बॅकस्टेज आर्टिस्टलाही इथे मोकळीक मिळते. आयोजनातील गमती-जमती तर अफाट आहेत. एका वर्षी कोजागिरीसाठी पाच किलो चारोळ्या पुण्याहून आणल्या होत्या!! जुन्या दिल्लीकरांचे अनुभव आणि दिल्लीचे मराठीपण जपण्यात या मंडळींनी केलेले विशेष प्रयत्न ऐकणे ही पर्वणीच असते.

निरनिराळ्या मराठी प्रदेशातून दिल्लीत आलेली मराठी कुटुंबे दिल्लीच्या निरनिराळ्या भागात रहात असली तरी विविध उपक्रमांसाठी दिल्ली मराठी कुटुंबम्हणून एकत्र येतातअलिकडच्या मराठी साहित्य संमेलनात याचा पुरेपूर अनुभव आला.

२००८ मथ्ये दिल्लीकर व्हावे का?”ह्या प्रश्नापासून सुरु झालेली साठा उत्तराची कहाणी, २०२५ मध्ये दिल्लीकर का व्हावे?” हे सांगण्यायोग्य सुफळ संपूर्ण झाली, हेच दिलवाल्या दिल्लीचे आपलेपण आहे.

*****

Friday, 14 March 2025

"उजेडाचे प्रवासी" - काव्यसंग्रह.


उजेडाचे प्रवासी” हे मित्र जीवन तळेगांवकर यांनी संपादित केलेले आणि आवर्जून वाचायला दिलेले पुस्तक वाचले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे सरांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा कवितासंग्रह अगदी मुळेसर म्हणतात तसाच ‘मायभूमीचे आणि मायबोलीचे ‌ऋण व्यक्त करण्याचा दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील कवींचा प्रातिनिधीक प्रयोग’ आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ महाजनसरांनी अगदी समर्पक बनवले आहे.

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मातृभाषेपासून दूर असलेल्या कवी मनांचे मराठी मानस सजग ठेवण्याचा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या पुस्तकातील बहुतेक सर्वच कवी/कवयित्री या दिल्ली परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय असल्यामुळे वैयक्तिक परिचित आहेत. त्यांचा मानस मराठी असला तरी यातील काही जणांसाठी व्यक्त व्हायला हिंदी भाषा जास्ती सोयीची आहे. त्यामुळे हा बहुभाषिक (मराठी आणि हिंदी) कविता संग्रह वाचताना मजा आली.
माझ्यासाठी सोयीचे म्हणून पहिल्यांदा सगळ्या मराठी कविता वाचल्या आणि नंतर एकेक हिंदी कविता. कदाचित एवढ्या हिंदी कविता वाचायची शाळेनंतरची ही माझी पहिलीच वेळ असावी!!😀

अतुल मोघेंच्या दोन्ही कवितांपैकी “कुंभमें स्नान कर आऊ” ही जरी (प्रयागराज कुंभमेळ्यामुळे) प्रासंगिक वाटत असली तरी ती तशी नाही. “अवसर ऐसे इस जीवन में बडे क्वचित आते है” असे म्हणताना ही कविता आपल्या रोजच्या जगण्यातील “मन का द्वंद्व” सहज उमटवून जाते.

डॉ. किर्ती काळे या सिद्धहस्त कवयित्रीने मात्र निराशा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन करताना शब्दांची गडबड झाली आहे. राजांनी “हिंदू” नव्हे “हिंदवी” स्वराज्य स्थापन केले. ते रयतेचे राज्य होते, कुणा एका धर्माचे नव्हते. त्यामुळे या कवितेतील “हिंदू हुंकाराला” धार्मिक दर्प आला आहे. तो टाळता आला असता.

हिंदीतल्या कविता वाचताना माझा हिंदी शब्दसंग्रह कमी असल्यामुळे खूपदा गोंधळ उडाला. काहीवेळा कविता परत-परत वाचाव्या लागल्या. “बरामदा” या शब्दाचा अर्थ मला अजूनही पुरता कळला‌ नाही. त्याला मराठीतला “व्हरांडा किंवा ओसरी” म्हणावे तर कवितेतच एका ठिकाणी “बरांडा” हा शब्द आला आहे. “बरामदा” आणि “बरांडा” यात नेमका काय फरक असावा हे शोधावे लागेल.

सौमित्र जोशींच्या “सामने तेरा लक्ष्य है, संघर्ष भरी राह है…. प्रयत्न तेरा विशेष है, विजय ही आराम है” – ही कविता कदाचित मला माझ्या हिंदी वाचनाचे उद्दिष्ट सांगून गेली!

त्यामानाने मराठी कवितांचे वाचन सोपे होते.

या पुस्तकाच्या पहिल्याच कवितेत अर्चना देशपांडे यांनी “दिसतं तसं नसतं” म्हणत काव्यसंग्रहाचा दृष्टीकोन स्पष्ट केला होता.

मला “कासव” ही कविता फार आवडली. डॉ अनुजा ‌वर्तक यांच्या “एक मत” आणि “लाडके” या कविता अंतर्मुख करतात.

अविनाश जोशीजी आणि आरतीताई कुलकर्णी यांचे लिखाण सतत निरनिराळ्या सोशल मीडिया गृपवर वाचत असल्यामुळे त्यांच्या कविता त्यांच्या नेहमीच्या स्वभावाच्या वाटल्या.
देवराज बाकडे यांची “मुलं दगावली नव्हती”, नचिकेत वडाळकरांची “तो अंधारात चालत होता” किंवा प्रमोद खाडिलकर यांची “हरवणं” यांसारख्या काही कविता अंतर्मुख करतात.

सर्वसाधारणपणे हे सगळे कवी/कवयित्री बरीच वर्षे महाराष्ट्राच्या बाहेर रहात असल्याचे आणि महाराष्ट्राशी “पाहुणा” संबंध असल्याचे यातल्या बऱ्याच कवितांमधून ठळक जाणवते..मग त्यातले संदर्भ फुलांच्या ताटव्याचे असोत, मायबोलीचे असोत, वारकरी संप्रदायाचे, विठ्ठल भक्तांचे असोत, चन्द्र, सूर्य तार्यांचे असोत की बळीराजाचे. या सगळ्यात मराठीबद्दल आस्था वाटते पण मातीचा कनेक्ट फार वर्षांपूर्वी आला आहे हे जाणवते.

डॉ चेतन शेलटकरांनी मांडलेला अनुभव महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांची धडपड व्यक्त करतो. हे पुस्तक जितक्या ग्रामीण तरुणांना वाचायला मिळेल त्यांना हा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

मित्र जीवन तळेगांवकर यांच्या कविता या नेहमीप्रमाणे “टोकदार” आहेत. एखाद्या प्रसंगावर किंवा व्यक्तीमत्वावर लिहीण्यात जीवनचा हातखंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी जोडीदाराबद्द्ल लिहीलेल्या कवितांमुळे ते वारंवार सिद्ध झाले आहे. या पुस्तकातील जीवनच्या दोन्ही कविता या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतात. महाभारतातील रोमांचकारी प्रसंग “किरातार्जुनियम” या कवितेतून त्यांनी अक्षरशः जीवंत केला आहे.

मुळे सरांच्या “शब्दाशिवाय” आणि “घुमटाखालची बासरी” या दोन्ही कविता या संग्रहाला शेवटी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

निरनिराळ्या धाटणीच्या, निरनिराळ्या विषयांवरील दिल्ली आणि परिसरातील कवी/कवयित्रींच्या कवितांचा गुच्छ मराठी मुलखाच्या हाती सुपूर्द करण्याचा हा प्रकल्प अतिशय सुंदर आहे. आत्ता साहित्य संमेलन हे जरी निमित्त असले तरी भविष्यात या सगळ्या मंडळींचा “कवी कट्टा” वारंवार आम्हा रसिकांना अनुभवायला मिळो.

त्यासाठी गणेश रामदासींच्या कवितेचा आधार घेत इतकीच इच्छा व्यक्त करूया:
“नवकवींचा न्यास नित्य नियमाने नवीदिल्लीत नांदावा”!!

“चिनार” सारख्यांचे पाठबळ भविष्यातही असेच मिळत राहील हीच सदिच्छा.

जाता जाता: या संग्रहात दिल्लीकरांनी लिहीलेल्या सगळ्याच कविता “गंभीर” स्वभावाच्या आहेत. हास्यकविता एकही नाही. राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी “प्रासंगिका/वात्रटिका” साठी मुबलक विषय उपलब्ध असताना एकही प्रतिभा तशी नसावी हे आश्चर्यकारक आहे!! इथे स्कोप आहे!😀
- मंदार कुलकर्णी
*****