एखाद्या व्यक्तीचे दुःख हलके व्हावे म्हणून तिला भेटणे, त्या व्यक्तीच्या दुःखद दिवसांत चार हलके-फुलके आनंदी क्षण देणे याला जर सांत्वन म्हणत असतील तर बहुतेकदा हे सांत्वन करताना ते करणारी व्यक्ती ते दुखःद क्षण कळत-नकळत इतके हलके करते की ज्याचे सांत्वन करायचे तोही बिचारा घुसमटतो!!
मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या आप्तस्वकीयांना धीर देणे हा सांत्वनातला सर्वोच्च प्रकार! त्यामुळे तो देणारे त्यात एक (गरज नसलेली) ‘आवश्यकता’(compulsiveness) बळजबरीने आणतात. ‘अरे, मला त्यांच्या घरी जाऊन त्या कुटूंबाला भेटलंच पाहीजे’ किंवा ‘पहिल्या दिवशी जमले नाही, पण दहा दिवसात एखादा दिवस नक्की जायलाच हवे’ असे संवाद आपण वारंवार ऐकतो. ‘लोक काय म्हणतील?’ या सामाजिक भितीतून ही अधीरता येत असावी. बरं, ज्या कुटूंबाचे सांत्वन करायचे आहे (ते आपण सोयीकरीता ‘यजमान कुटूंब’ म्हणूया) त्यांच्या मानसिकतेचा, दु:खाचा किंवा त्यांच्या तत्कालिन गरजांचा बट्ट्याबोळ करायलाही हे ‘सांत्वनकार’ मागे-पुढे पहात नाहीत.
अशी कल्पना करू की नव्वद-पंच्याण्णव वर्षे वयाच्या एका आजोबांचं दुःखद निधन झालंय आणि त्यांच्या पश्चात असणारी त्यांची मुलं, नातवंडं वगैरेंच्या सांत्वनाकरता त्यांच्या घरी जे लोक येत आहेत त्यातले काही निवडक प्रसंग-
सर्वसाधारणपणे, ‘कधी झाली ही घटना?’; ‘आजारी होते का? काल-परवा तर मला भेटले रस्त्यावर!’ ... अशी पहिली अनिवार्य पंधरा षटके खेळून काढली की मग सांत्वनकारांची खरी फलंदाजी सुरू होते!...
‘कुठला दवाखाना?’ या प्रश्नावर यजमानांचे ‘अबक हॉस्पिटल’ असे उत्तर मिळते आणि सांत्वनकाराला ‘फूलटॉस’ मिळाल्याचा आनंद मिळतो. ‘अरेरे...’ असे म्हणत सांत्वनकार stance घेतो, ‘अरे तिथे कशाला गेलात कडमडायला? ते एक नंबरचे लुच्चे आहेत. परवा मी साधं डोकं दुखतंय म्हणून गेलो तर काय-काय टेस्ट करवल्या. अरे, विचारू नकोस. तुला सांगतो आजकाल डॉक्टरांवर भरवसाच राहिला नाही. अरे किमान मला तरी विचारायचे! (इथे मात्र यजमान आपल्या मुठी आवळतो कारण वास्तविक हे सांत्वनकार सद्गृहस्थ भिक्षुकी करतात. पेशंटचे रिपोर्ट्स डॉक्टरांना दाखवण्याऐवजी तुम्हाला दाखवून दवाखान्यात अॅडमिट करायचा मुहूर्त काढू का? – हा प्रश्न मनातच गिळतो आणि “हो-हो, चुकलंच माझं” असं म्हणतो).
त्यानंतर हे भिक्षूक-काका ‘पुढचं कार्य कुठे करणार आहात?’ असा व्यावसायिक प्रश्न विचारतात. आता हॉस्पिटल प्रकरणात शेकले गेलेले यजमान चालाख असतील तर ‘तुम्हीच सांगा’ असं म्हणतात मग पुढच्या फलंदाजीची तयारी पूर्ण होते.
तोवर, एक वयस्कर गृहस्थ येऊन बसलेले असतात. त्यांना यजमानातील कुणीही ओळखत नसते. “फार लाघवी स्वभाव हो! एकदम मनमिळाऊ...” अशी अनिवार्य षटकं टाकून झाली तरी समोरचा दाद देत नाही हे त्यांच्या एव्हाना लक्षात येतं. मग दहा-पंधरा मिनीटे पूर्ण शांतता. यजमान मनात गयावया करतो, काका, मला पाठ टेकवू द्या ना!तर इकडे काका मनातल्या मनात निरोप घेण्याची अचुक संधी शोधत असतात. एवढ्यात यजमानाचा मोबाईल वाजतो आणि तो “आलोच” असे म्हणून आणि काका ‘आता निघतो’ असे म्हणून निरोप घेतात आणि एकमेकांची सुटका होते.
एखादा सांत्वनकार हा पुलंच्या हरितात्यांसारखा असतो. “तुला सांगतो, पुरूषोत्तमा...” असं म्हणत तो आपल्या स्वतःच्या आईच्या वेळेची कथा रंगवायला सुरू करतो. “साधं पोटात दुखायचं निमित्त रे! किती डॉक्टर, किती त्या वेगवेगळ्या टेस्ट. काही बोलायची सोय नाही. दोन वर्षे अखंड प्रयत्न सुरू होते, पाण्यासारखा पैसा खर्च केला. सगळे नवस, उपास-तापास, व्रतं-वैकल्यं सगळं-सगळं केलं. पण यश आले नाही....” हे सांगताना तो स्वतःच गहिवरतो आणि एक वेळ अशी येते की प्रत्यक्ष यजमानच (स्वतःचे दुःख बाजुला सारून) पुढे सरसावतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो!!
या सगळ्या प्रकारात अजुन असे काही नमुने असतात ज्यांना वाटतं की यजमान कुटूंबापेक्षा माझेच दुःख जास्त आहे. “अहो, माझी नुकतीच बदली झाली आहे. रोज मला पुण्याहून लोणावळ्याला जावे लागते. दिवसाचे दोन तास फक्त प्रवासात खर्च होतात. शिवाय थकवा वेगळा” असे एखादा गृहस्थ आपली व्यथा यजमानाला सांगत असतो. तोच घरात बसून कंटाळलेले एखादे काका त्याला लोकलचा प्रवास हा महामार्गावरच्या प्रवासापेक्षा उत्तम कसा?- हे समजावायला लागतात. “अहो, मी बावीस वर्षे लोकलने प्रवास केला. पंचेचाळीस मिनीटात लोणावळा.....काय घेऊन बसलात गाडीचे?...वगैरे,वगैरे”. वास्तविक, या गृहस्थाला स्वतःच्या घरातून रेल्वे स्टेशनवर पोहोचायला जेवढा वेळ लागतो तितक्याच वेळात तो गाडीने लोणावळ्याला पोहोचतो. हे तो समजावून सांगतोही पण बरेच दिवस बोलण्याची (खरंतर वाद-विवादाची) संधी न मिळालेले काका मात्र हट्टाला पेटतात आणि ट्रेनच कशी किफायतशीर आहे हे समजावून सांगू लागतात. या विवादात दोघांचाही आवाज इतका वाढतो की शेवटी प्रत्यक्ष यजमानालाच मध्यस्थी करावी लागते!
सांत्वन करायला जाणे ही सामाजिक जबाबदारी आहे अशी ठाम समजूत करून घेऊन काही मंडळी आपली वैयक्तिक जबाबदारी थोडी बाजूला ठेवून पुढे सरसावतात पण इथेच घात होतो. अशी मंडळी सांत्वनाला घरी येतानाच मोबाईलवर बोलत बोलत घरी येतात. आल्यावर यजमानाला तर्जनी दाखवून ‘एक मिनीट’ वेळ मागून घेतात. मग पाच मिनीटांनी फोनवरच्या पलिकडच्या माणसाला ‘मी तूला दहा मिनीटात फोन करतो’ असे जाहीर आश्वासन देऊन मग यजमानाकडे वळतात. यजमानाशी बोलायला सुरू करणार इतक्यातच परत फोन वाजतो. ‘सॉरी, अर्जंट फोन आहे’ असे यजमानाला सांगून फोन उचलतात. मग सुरूवातीला समोरून ऐकू येत नसल्याने स्वतःचा आवाज वाढवतात. मग लक्षात येते इथे रेंज नाही.. मग यजमानाच्या घरातले कोपरे, खिडक्या इ. ठिकाणे रेंजसाठी तपासली जातात. “....नाही मी काय म्हणतो, आत्ता एवढा एक ट्रक उतरवून घ्या. आठ दिवसात आपण बाकी सगळा हिशेब करू..... अहो, मी बाहेर आहे. इथे रेंज नाही म्हणून ऐकू येत नाही. तुम्ही उतरवून घ्या सामान.......”. मग फोन संपतो. तो बाजूला ठेवण्याआधीच पुन्हा फोन वाजतो. हा बहुदा ट्रक ड्रायव्हरचा असावा कारण यांचा आवाज चढलेला असतो...”तुला सांगितले आहे ना? मग परत का कुरबूर?....” रेंज गेली म्हणून आता सरळ घराबाहेर जाऊन आरडाओरड!!! बोलत बोलत हे गृहस्थ आपल्या गाडीजवळ जातात. चावी लावून गाडी सुरू करणार इतक्यात लक्षात येते की चपला काढल्या त्या अजून दरवाजातच आहेत. मग परत दाराशी येऊन चपला घालत-घालत यजमानांना ‘परत येतो सवडीने, आत्ता जरा घाईत आहे’ असा निरोप दिला जातो. यजमानच त्याला ‘सांभाळून जा’ असा आशीर्वाद देतो आणि परत आपल्या घरी येऊन बसतो.
खरेच या असल्या सांत्वनांची गरज असते? की नेमके हेच ते चार सुखाचे- ‘स्वतःचे दुःख विसरण्याचे’ क्षण??
शेवटी सुरेश भटांच्या ओळीत लिहीलंय तेच खरं –
‘लोक भेटायास आले, काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले.
-----------***---------------