Sunday, 12 November 2017

बस कंडक्टर

खूप दिवसांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाडीतून (हो, लाल-डबा) प्रवासाचा योग आला. त्यातून जागाही माझ्या आवडीची मिळाली- कंडक्टरच्या शेजारी! हो, लहानपणापासूनच कंडक्टरच्या शेजारची सीट ही माझी आवडती जागा आहे. नकळत येणारे-जाणारे प्रवासी, येणारे थांबे इत्यादी एस्टीत घडणार्या प्रत्येक हालचालीचा आपण घटक असल्याचा फील येतो. पूर्वी अजून एक मजा असायची. कंडक्टर तिकीटे फाडायचा आणि त्याला एका धमाल यंत्राने अगम्य भोकं पाडायचा. ते यंत्र धमाल एवढ्यासाठी की ते इतर कुठेही आणि इतर कसलीही भोकं पाडायला ते किंवा तसले यंत्र वापरल्याचे माहित नाही. अगदी लहानपणीच्या खेळण्यांमध्येही वैद्यकिय सेट, करवत, हातोडी इ. सुतारकीचं साहित्य वगैरे सगळे मिळायचे, पण "तिकीट-तिकीट" असं म्हणत वाजवायला "ते" यंत्र कधी मिळाले नाही.
बरं, एकदा का सगळ्यांची तिकीटं देऊन झाली की, मग कंडक्टरसाहेब एक छोटं पॅड काढंत. त्यावरचा कागद रबराने घट्ट गुंडाळलेला असे. मग काळ्या पिशवीतून पेन काढून तिकीटांचे नंबर लिहीताना ते वाचण्यासाठी/समजण्यासाठी केलेली धडपड हा म्हणजे कंडक्टरशेजारी बसून केलेल्या प्रवासातला परमोच्च आनंदाचा अनुभव!
तिकीटाच्या डब्याच्या दोन्ही बाजूंचे नंबर "ओढून" झाले की कॅश मोजण्याचा कार्यक्रम सुरू होई. एव्हाना बरेचसे प्रवासी "याचसाठी केला होता अट्टाहास" या भावनेने झोपी गेलेले असंत. नोटा मोजण्याची एस्टी कंडक्टर इतकी शिस्तबद्ध  पद्धत मी आजवर पाहिलेली नाही.  (यांना खरंतर गेल्या वर्षांत  रिझर्व्ह  बँकेत पाठवायला हवे होते).    पहिल्यांदा काळ्या बॅगेत कोंबलेल्या सगळ्या नोटा बाहेर काढायच्या. मग त्या सगळ्यांना ईस्त्री केल्यासारखे सरळ करायचे. बहुसंख्य  दहाच्या नोटांचे कोपरे दुमडलेले असत ते एकेक तन्मयतेने सरळ करायचे. ही तन्मयता एखाद्या माऊलीने आपल्या तान्ह्या  बाळाला तीट लावावी इतकी निरागस आणि वात्सल्यमय असे. एकदा का सगळ्या नोटा सरळ झाल्या की मग हाताच्या बोटांच्या फटीत दहा-वीस-पन्नास-शंभर असं वर्गीकरण होई. मग त्या सगळ्यांची मोजणी होई. मग चिल्लर मोजली जाई. त्यानंतर पुन्हा कागदावर काही  आकडेमोड.
आता काम संपलंय असं वाटावं तोच शर्टाच्या खिशातून  एक मोठ्या नोटांचा गठ्ठा बाहेर येई आणि त्याची हिशेबवारी करून नवीन जमलेल्या मोठ्या नोटा त्यात खुपसल्या की मग उत्तरपूजेचा मार्ग मोकळा!!
हे सगळं लिहायचं कारण आजकाल एस्टी बदलली आहे. कंडक्टरला तिकीट  नव्या यंत्रातून डायरेक्ट मिळतं. नोटा मोजणीची पद्धत तशीच असली तरी एकूण जमा रक्कम आणि टोलचा खर्च वजा करून उरलेली रक्कम  एका बटणाच्या इशार्यावर मिळते. चालत्या  बसमध्ये चौकटीत आकडे लिहायची मजा काही औरच होती.
पण त्यामुळे कंडक्टरसाहेब लगेच रिकामे होतात आणि गप्पा सुरू होतात त्या अर्थात - संपापासून. तीन-चार हजार बेसिक अधिक भत्ता असे कसेबसे चौदा-पंधरा हजार मासिक उत्पन्न. "काय हुतंय येवढ्यात?" याचे उत्तर कुणाकडेच नाही. सरकारी नियमानुसार वेतनवाढ केली नाही तर जानेवारीचा इरादा पक्का. मग मी "अहो कुठून आणणार सरकार तरी एवढे पैसे?" अशी ओढाताण केली तर आलेलं उत्तर फार काही सांगून गेलं...."सरकारी म्हणून पकडलेली नोकरी  कुटुंबाला आर्थिक  स्थैर्य तर देत नाहीच पण अत्यावश्यक सेवा म्हणून दर सणासुदीला किंवा सुट्टीत  घरापासून दूर रहायचं -कशासाठी?" "हे ड्रायव्हर खासगी गाड्या चालवून इथल्यापेक्षा जास्त कमावतील- अडचण आमची आहे". हे खरंच. Skill India चा पहिला प्रयोग या कंडक्टर मंडळीवर व्हायला हवा! पुढे  मी जेंव्हा म्हणालो, "अहो, ही सेवा बहुजन हिताय; बहुजन सुखाय आहे ती केवळ तुमच्या भरवशावर"... त्यावर कंडक्टरसाहेब म्हणतात, "आता 'जय महाराष्ट्र ' करायची वेळ आली आहे ".......