Saturday, 20 March 2021

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते....


(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून…)

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते

तुमची आणि आमची तशी खूप असते

काय म्हणता?

डोळे फार जड वाटतात? जागरणामुळे चुरचूरतात?

जड वाटले तर वाटू देत

चुरचूरले तर चुरचूरू देत

कारण

कारण

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते

तुमची आणि आमची तशी खूप असते.

मराठीत ‘वामकुक्षी’ म्हणून ‘लवंडता’ येतं,

हिंदीत ‘नींद’ म्हणून ‘सोता’ येतं,

पांघरुण नसलं तरी पहुडता येतं,

पापण्या न मिटता पडून रहाता येतं.

‘ड्रीम’ पहाण्यासाठी मिळालेली ती एक ‘स्लीप’ असते

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते

तुमची आणि आमची तशी खूप असते ||१||

रात्रभर जागलं की डोळे खूप लाल होतात

दिवसभर जांभयांनी मग, तोंडाचे खूप हाल होतात.

आठवतं ना?

तुमची-माझी जेंव्हा फजिती झाली होती

गाण्याची मैफल आपण अर्धवट सोडली होती.

गाणी ऐकत खुर्चीवर बेभान होऊन बसलो होतो (?)

अनावर झोपेमुळे पडता पडता वाचलो होतो!

रात्रभर बसलो असतो तरीसुद्धा चाललं असतं

झोपेनंच आपल्याला अलगद ‘उठवलं’ असतं!!

तुम्हाला हे कळलं होतं

मलासुद्धा हे कळलं होतं.

कारण

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते

तुमची आणि आमची तशी खूप असते ||२||

झोप-बीप कमी असते, 

म्हणणारी माणसं भेटतात

झोप म्हणजे व्याप नुसता, 

म्हणणारी माणसं भेटतात !

असाच एकजण मला लोकलमध्ये म्हणाला,

“आम्ही कधी उभ्या-उभ्या झोपलो नाही

भारतभर फिरलो, 

पण कधी शेजारच्यावर कलंडलो नाही!

तुम्हीच सांगा, झोप कुणाला आवरता येते का?

घोरणं कुणाच्या हातात असतं का?”

त्याला वाटलं, मला पटलं!

तेंव्हा मी फक्त इतकंच म्हटलं:

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते

तुमची गाते अन् आमची मान‌ बोलावते!! ||३||

उन्हाळ्याच्या रात्री अंगणात कधी

 झोपला असाल आवडीने

एक ब्लॅंकेट अर्धं-अर्धं

 पुरलं असेल थंडीने!

भर दुपारी कधी तुडुंब जेवल्यावर

तासन् तास झोपला असाल

तारवटलेल्या डोळ्यांनी

कधी अंथरुणावर कोसळला असाल!

झोप कधी गाणं असतं

तालबद्ध घोरणं असतं.

झोप कधी मोडते सुद्धा

काळ-झोप ‘उठवते’ सुद्धा!

दोन मिनिटांची डुलकी सुद्धा झोप असते,

डाराडूर कुंभकर्णी सुद्धा झोप असते.

झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते

तुमची आणि आमची तशी खूप असते ||४||


… मंदार कुलकर्णी.



No comments:

Post a Comment