विकत घेताना…
इंजिनीअर बनलो तरीही यंत्रांशी बोलण्यापेक्षा मला माणसांशीच बोलायला जास्त आवडते. कदाचित म्हणूनच माझ्या नशीबात सुरुवातीपासून इंजीनियरिंग उत्पादने विकत घेण्याची जबाबदारी आली (आणि सोबत मोबाईल फोन इंडस्ट्री आली!) त्याचा फायदा असा आहे की आपापली उत्पादने विकत देणारे विक्रेते माझ्यासोबत भरभरून बोलत रहातात. एखाद्या विक्रेत्या कंपनीच्या उच्च अधिकारी ते अगदी सामान घेऊन येणारा ट्रक ड्रायव्हर किंवा उच्च पदस्थ कस्टम अधिकारी ते सामानाची चढ-उतार करणारा लोडर सगळेच आपापल्या परीने मनापासून बोलतात. अर्थात यातल्या प्रत्येकाला एक स्वतंत्र ‘व्यक्तिमत्व’ आहे आणि त्यांच्याबरोबरच्या संवादात ते नकळत जपताना खूप मजा येते.
जशी उच्च अधिकारी ते लोडर ही एक रेंज आहे, तशीच आंतरराष्ट्रीय बाजाराची एक भौगोलिक रेंज आहे. जपानपासून अमेरिकेपर्यंत आणि नॉर्वे पासून ते ऑस्ट्रेलिया पर्यंत. प्रत्येकाचा संवादाचा बाज वेगळा, ढंग वेगळा. जे जपानी मंडळींना चालू शकते, ते युरोपियन सहन करतीलच याची खात्री नाही. अगदी चर्चा सुरू असताना सगळ्यांसाठी चहा/कॉफी आली तर आधी कप उचलून कुणी पहिला घोट घ्यायचा याचे सुद्धा वेगवेगळे संकेत आहेत. ‘चहा घ्या’ असा आग्रह अव्हेरुन जोवर यजमान चहा घ्यायला सुरू करत नाहीत तोवर चहाकडे ढुंकूनही न पहाणारेही काही पाहुणे असतात! जर यजमानही ‘जोवर पाहुणा चहा घेत नाही तोवर मी कसा घेऊ?’ या परंपरेतला असेल तर दोन्ही घरचा पाहुणा उपाशी रहातो, कधीकधी!! अर्थात ही ज्याची त्याची पारंपारिक पद्धत असते त्यामुळे त्यात चूक-बरोबर असे काही नसते.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळात माझा जपानी लोकांशी खूप संबंध आला. तसे जपानी लोक ‘सरळ’ असतात. आपण छातीवर हात ठेवून म्हणतो तसे ते नाकावर बोट ठेवून ‘मी’ म्हणतात. ही मंडळी आपल्या कामाशी प्रचंड प्रामाणिक असतात. जोपर्यंत ते जिंकत नाहीत तोवर त्यांच्यासाठी सामना संपलेला नसतो. तो जिंकण्यासाठी कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे त्यांना ‘टारगेट’ द्यायला खूप मजा येते.
कष्ट चीनी लोकसुद्धा प्रचंड करतात. पण ते जपान्यांसारखे ‘सरळ’ असतीलच याची खात्री नाही. जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जायला ते मागे-पुढे पहात नाहीत. अगदी कागद-पत्र लंपास करणे, संभाषण न सांगता रेकॉर्ड करणे वगैरे करण्यात त्यांना वाईट वाटत नाही. गंमत म्हणजे दोन चीनी एकाच मिटींगमध्ये असतील तर मिटींग इंग्रजीतून होईल याची खात्री नाही!! मी तर चीनी कंपनीत काम केलं आहे त्यामुळे त्यांच्या सवयी, एटीकेटस् वगैरे स्वतंत्र लिहीण्याचा विषय होऊ शकतो. मुळात समोरच्या वर विश्वास ठेवायला ते आपला हात आखडता घेतात. अर्थात हा त्यांच्या देशाच्या राजकिय जडणघडणीचा भाग असावा. कदाचित म्हणूनच कोरीयन हे जपानी आणि चिनी दोघांच्या मधला प्रकार आहे. ते जपान्यांइतके पारदर्शी नसतील पण चीनीलोकांइतके अविश्र्वासु नक्कीच नाहीत.
राजकीय जडणघडणीचा खरा अनुभव येतो तो इस्त्रायली लोकांशी बोलताना. हे लोक सहसा लगेच व्यक्त होत नाहीत. सुरुवातीला ते ‘आखडू’ वाटतात. शब्द न् शब्द मोजून-मापून बोलतात. यांच्याकडून ठरवल्यापेक्षा एकही शब्द/माहिती जास्ती मिळणे केवळ अशक्य!! म्हणूनच आजही इलेक्ट्रॉनिक संरक्षक वस्तूंमध्ये ते जगात सर्वोत्तम आहेत. (इथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संरक्षण अभिप्रेत आहे. उदा. हॅकिंग, टेलिफोन टॅपींग किंवा यांना रोखणारी प्रणाली, घर, ऑफिस संरक्षक प्रणाली इत्यादी.). पण हळूहळू जसा विश्वास वाढत जातो तसे मग धमाल मोकळे होतात.
जर्मन माणसाला भारतात येऊन काही विकणे (तेही चिनी उत्पादनांची स्पर्धा करून) हे मुळात आवडत नसावे. महाराष्ट्रातील काही सरकारी अधिकारी हे मुंबईतून गडचिरोलीला बदली होऊन जातात तसेच जर्मन कंपन्या भारतात विक्रीसाठी आपले अधिकारी पाठवत असावेत. ‘घ्यायचे असेल तर घे, नाहीतर मला मोकळे कर. मी चाललो’ – हाच खाक्या!!
एकदा एका जर्मन विक्रेत्याची जिरवायची ठरवली. तो माझ्या सहकाऱ्याला काहीतरी वेडेवाकडे बोलला होता. त्याला सकाळी अकरा वाजता भेटायला बोलावले. ठरवून बारा वाजेपर्यंत भेटलोच नाही. बारा वाजता महाशय लालबुंद होऊन मिटींगरूम मध्ये आले. नाग फुसफुसावा तशी फुसफूस चालू होती. मी त्याला सही न केलेली ऑर्डर दाखवली. गडी थोडा नॉर्मल झाला!! त्याला सांगितले ऑर्डर संध्याकाळी मिळेल. तोवर इथेच थांब!! मग मी त्याला दिसेल अश्याप्रकारे दुसर्या रुममध्ये गेलो. तिथे काही चिनी मंडळीं आधीच बसली होती. त्यांच्याशी तासभर गप्पा मारल्या. (त्यांना अजेंडा लागत नाही. ‘मी भेटलो' – हीच उपलब्धता!!). इकडे जर्मन मित्र पेटला होता. मला दहा मिनीटे आणि त्यांना एक तास!! ही खदखद त्याने माझ्या सहकाऱ्यांसमोर व्यक्त केली. शेवटी चार वाजता त्याचे ‘भारत, इथला व्यवसाय, इथल्या गरजा, इथली स्पर्धा वगैरे' विषयांवर बौद्धिक घेतले आणि मग ऑर्डर दिली. यथावकाश तो छान मित्र झाला हे सांगायची गरज नाही. त्याची भारताकडे पहायची नजरही बदलली.
बाकीचे युरोपियन आणि अमेरिकन ही यांच्यापेक्षा वेगळे आहेत. ते कामाच्या बाबतीत प्रचंड व्यावसायिक आहेत. डिसेंबरमध्ये मी एका डिलीव्हरी साठी पाठपुरावा करत असताना, एका स्विडनस्थित मॅडमनी मला 'मित्रा, मी तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही कारण मी आत्ता ख्रिसमसच्या भेट-वस्तू खरेदीची यादी बनवते आहे’ असे सांगितले होते!
अर्थात वरचे सगळे माझे अनुभव आहेत. मला भेटलेले लोक हे माझ्यासाठी त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. राशीचक्रकार उपाध्ये जसे सगळ्या राशींचे वर्णन करतात तसेच मी या देशाबद्दल करण्यासाठी या व्यक्तींचा वापर केला आहे इतकंच.
असेच लोक मला वैविध्यतेने नटलेल्या आणि परंपरांचे पाईक असलेल्या आपल्या भारत देशाच्या विविध भागांतून भेटले. त्यांच्याविषयी नंतर कधीतरी.
*****
No comments:
Post a Comment