प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मातृभाषेपासून दूर असलेल्या कवी मनांचे मराठी मानस सजग ठेवण्याचा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या पुस्तकातील बहुतेक सर्वच कवी/कवयित्री या दिल्ली परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय असल्यामुळे वैयक्तिक परिचित आहेत. त्यांचा मानस मराठी असला तरी यातील काही जणांसाठी व्यक्त व्हायला हिंदी भाषा जास्ती सोयीची आहे. त्यामुळे हा बहुभाषिक (मराठी आणि हिंदी) कविता संग्रह वाचताना मजा आली.
माझ्यासाठी सोयीचे म्हणून पहिल्यांदा सगळ्या मराठी कविता वाचल्या आणि नंतर एकेक हिंदी कविता. कदाचित एवढ्या हिंदी कविता वाचायची शाळेनंतरची ही माझी पहिलीच वेळ असावी!!😀
अतुल मोघेंच्या दोन्ही कवितांपैकी “कुंभमें स्नान कर आऊ” ही जरी (प्रयागराज कुंभमेळ्यामुळे) प्रासंगिक वाटत असली तरी ती तशी नाही. “अवसर ऐसे इस जीवन में बडे क्वचित आते है” असे म्हणताना ही कविता आपल्या रोजच्या जगण्यातील “मन का द्वंद्व” सहज उमटवून जाते.
डॉ. किर्ती काळे या सिद्धहस्त कवयित्रीने मात्र निराशा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन करताना शब्दांची गडबड झाली आहे. राजांनी “हिंदू” नव्हे “हिंदवी” स्वराज्य स्थापन केले. ते रयतेचे राज्य होते, कुणा एका धर्माचे नव्हते. त्यामुळे या कवितेतील “हिंदू हुंकाराला” धार्मिक दर्प आला आहे. तो टाळता आला असता.
हिंदीतल्या कविता वाचताना माझा हिंदी शब्दसंग्रह कमी असल्यामुळे खूपदा गोंधळ उडाला. काहीवेळा कविता परत-परत वाचाव्या लागल्या. “बरामदा” या शब्दाचा अर्थ मला अजूनही पुरता कळला नाही. त्याला मराठीतला “व्हरांडा किंवा ओसरी” म्हणावे तर कवितेतच एका ठिकाणी “बरांडा” हा शब्द आला आहे. “बरामदा” आणि “बरांडा” यात नेमका काय फरक असावा हे शोधावे लागेल.
सौमित्र जोशींच्या “सामने तेरा लक्ष्य है, संघर्ष भरी राह है…. प्रयत्न तेरा विशेष है, विजय ही आराम है” – ही कविता कदाचित मला माझ्या हिंदी वाचनाचे उद्दिष्ट सांगून गेली!
त्यामानाने मराठी कवितांचे वाचन सोपे होते.
या पुस्तकाच्या पहिल्याच कवितेत अर्चना देशपांडे यांनी “दिसतं तसं नसतं” म्हणत काव्यसंग्रहाचा दृष्टीकोन स्पष्ट केला होता.
मला “कासव” ही कविता फार आवडली. डॉ अनुजा वर्तक यांच्या “एक मत” आणि “लाडके” या कविता अंतर्मुख करतात.
अविनाश जोशीजी आणि आरतीताई कुलकर्णी यांचे लिखाण सतत निरनिराळ्या सोशल मीडिया गृपवर वाचत असल्यामुळे त्यांच्या कविता त्यांच्या नेहमीच्या स्वभावाच्या वाटल्या.
देवराज बाकडे यांची “मुलं दगावली नव्हती”, नचिकेत वडाळकरांची “तो अंधारात चालत होता” किंवा प्रमोद खाडिलकर यांची “हरवणं” यांसारख्या काही कविता अंतर्मुख करतात.
सर्वसाधारणपणे हे सगळे कवी/कवयित्री बरीच वर्षे महाराष्ट्राच्या बाहेर रहात असल्याचे आणि महाराष्ट्राशी “पाहुणा” संबंध असल्याचे यातल्या बऱ्याच कवितांमधून ठळक जाणवते..मग त्यातले संदर्भ फुलांच्या ताटव्याचे असोत, मायबोलीचे असोत, वारकरी संप्रदायाचे, विठ्ठल भक्तांचे असोत, चन्द्र, सूर्य तार्यांचे असोत की बळीराजाचे. या सगळ्यात मराठीबद्दल आस्था वाटते पण मातीचा कनेक्ट फार वर्षांपूर्वी आला आहे हे जाणवते.
डॉ चेतन शेलटकरांनी मांडलेला अनुभव महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांची धडपड व्यक्त करतो. हे पुस्तक जितक्या ग्रामीण तरुणांना वाचायला मिळेल त्यांना हा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
मित्र जीवन तळेगांवकर यांच्या कविता या नेहमीप्रमाणे “टोकदार” आहेत. एखाद्या प्रसंगावर किंवा व्यक्तीमत्वावर लिहीण्यात जीवनचा हातखंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी जोडीदाराबद्द्ल लिहीलेल्या कवितांमुळे ते वारंवार सिद्ध झाले आहे. या पुस्तकातील जीवनच्या दोन्ही कविता या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतात. महाभारतातील रोमांचकारी प्रसंग “किरातार्जुनियम” या कवितेतून त्यांनी अक्षरशः जीवंत केला आहे.
मुळे सरांच्या “शब्दाशिवाय” आणि “घुमटाखालची बासरी” या दोन्ही कविता या संग्रहाला शेवटी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.
निरनिराळ्या धाटणीच्या, निरनिराळ्या विषयांवरील दिल्ली आणि परिसरातील कवी/कवयित्रींच्या कवितांचा गुच्छ मराठी मुलखाच्या हाती सुपूर्द करण्याचा हा प्रकल्प अतिशय सुंदर आहे. आत्ता साहित्य संमेलन हे जरी निमित्त असले तरी भविष्यात या सगळ्या मंडळींचा “कवी कट्टा” वारंवार आम्हा रसिकांना अनुभवायला मिळो.
त्यासाठी गणेश रामदासींच्या कवितेचा आधार घेत इतकीच इच्छा व्यक्त करूया:
“नवकवींचा न्यास नित्य नियमाने नवीदिल्लीत नांदावा”!!
“चिनार” सारख्यांचे पाठबळ भविष्यातही असेच मिळत राहील हीच सदिच्छा.
जाता जाता: या संग्रहात दिल्लीकरांनी लिहीलेल्या सगळ्याच कविता “गंभीर” स्वभावाच्या आहेत. हास्यकविता एकही नाही. राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी “प्रासंगिका/वात्रटिका” साठी मुबलक विषय उपलब्ध असताना एकही प्रतिभा तशी नसावी हे आश्चर्यकारक आहे!! इथे स्कोप आहे!😀
- मंदार कुलकर्णी
*****
No comments:
Post a Comment